अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रात्रीच्या वेळी वाद होऊन गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने शहर पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून रात्री फिरणार्यांची तपासणी केली जात आहे. मंगळवारी रात्री सावेडी उपनगरात राबविलेल्या तपासणी मोहिमेत पाच जण दारूच्या नशेत मिळून आले. त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कॉटेज कॉर्नर येथे नाकाबंदीदरम्यान दुचाकीवरून जाणार्या नयन राजेंद्र तांदळे (वय 28 रा. नवननगर, भिस्तबाग) याला पोलिसांनी पकडले. तो दारू पिऊन दुचाकी चालवत असल्याचे तपासणीतून समोर आले. तपोवन रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगर चौकात नानासाहेब रतन गोपाळ (वय 42 रा. तपोवन रस्ता) हा दारू पिलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याची पोलिसांनी तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे.
त्याच ठिकाणी मंगेश शामराव पलघडमल (वय 38 रा. सोनगाव सात्रळ ता. राहुरी) हा दारूच्या नशेत आढळून आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण सुरेश काळे (वय 31 रा. यवतमाळ, सध्या रा. लक्ष्मीनगर, तपोवन रस्ता) हा देखील तपोवन रस्त्यावर दारूच्या नशेत मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉटेज कॉर्नर येथे सर्वेश सिताराम तिवारी (वय 24 रा. सावेडीगाव) हा दारूच्या नशेत मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रात्री 11 वाजेनंतर हॉटेल, परमीट रूम, सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी तोफखाना पोलिसांकडून केली जात असून रात्रीच्यावेळी नाकाबंदी केल्यानंतर अनेकजण दारूच्या नशेत मिळून येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.