Thursday, November 14, 2024
Homeनगरसंलग्न पोलीस अधिकारी, अंमलदार तात्काळ सोडा

संलग्न पोलीस अधिकारी, अंमलदार तात्काळ सोडा

अधीक्षक ओला यांचे प्रभारी अधिकार्‍यांना आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बदली झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना संलग्न नियुक्ती दिली असेल तर त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही आदेश काढून अशा अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या बदली ठिकाणी/ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्यांना कार्यमुक्त न केल्यास संबंधित प्रभारी अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बदली झाल्यानंतर इतर ठिकाणी संलग्न करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसतानाही पोलीस ठाणे, विविध शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक अधिकारी व अंमलदार यांना विविध कारणातून संलग्न करून घेतले जाते. जिल्हा पोलीस दलात अनेक ठिकाणी संलग्न काम करणारे अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना संलग्न केल्यामुळे मूळ नेमणुकीस असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना काम करताना अडचणी निर्माण होतात. तसेच ज्याठिकाणी त्यांची मूळ नेमणूक असते तेथेही मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. यामुळेच अपर पोलीस महासंचालक सक्सेना यांनी आदेश काढून संलग्न अधिकारी व अंमलदार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांचे आदेश प्राप्त होताच अधीक्षक ओला यांनीही आदेश काढून संलग्न अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या बदली ठिकाणी/ मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करण्यात येऊन कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जे प्रभारी अधिकारी संलग्न अधिकारी व अंमलदार यांना कार्यमुक्त करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या