रावेर|प्रतिनिधी-
निंभोरा बुद्रुक (ता.रावेर) येथील पोलिस उपनिरीक्षकास १० हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, बुधवारी दुपारी ३वा.पोलिस उपनिरीक्षक कैलास ठाकूर वय-५६ याने जळगांव येथील बारा कवर नगर सिंधी कॉलनीतील गाडी मालकाची निंभोरा पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेली एर्टिगा कार सोडण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची मागणी केली. यात तक्रारदार याने तडजोड करुन १० हजार रुपये ठरवून, याबाबत लाच लुचपत विभागात तक्रार केल्याने,सदरील रक्कम देताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून पोलिस उपनिरीक्षकास अटक केली आहे. सदरील कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अमोल वालझाडे,स.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.कॉ अमोल सूर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे यांच्या पथकाने केली.