
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. मिस्कीन मळा परिसरातून घरी जात असलेल्या प्रिया विजय मोटवानी (वय 59, रा. सिंधी कॉलनी, तारकपूर) या महिलेला अडवून दोन अनोळखी इसमांनी हातचलाखीने तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या आहेत.
प्रिया मोटवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रिया मोटवानी या सिंधी कॉलनीकडे पायी जात असताना रामपुरवाला सन्स या दुकानासमोर दोन अनोळखी व्यक्ती उभे होते. त्यांनी प्रिया मोटवानी यांना बोलावले आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढल्याची बतावणी करत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर, हातातील सोन्याच्या बांगड्या सुरक्षित ठेवण्यासाठी कागदात पॅक करून देण्याचे नाटक करत त्यांनी हातचलाखी केली. त्यांनी खोट्या बांगड्या देऊन प्रिया मोटवानी यांच्या हातातील तीन तोळ्यांच्या दोन खर्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.




