Thursday, April 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकुल्फी कारखान्यावर पोलिसांची धाड; मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त

कुल्फी कारखान्यावर पोलिसांची धाड; मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

- Advertisement -

इगतपुरी शहरात बनावट कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्याचा इगतपुरी पोलिसांनी पर्दाफास केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत कुल्फी तयार करण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ सफेद ‘गोबिंदा’ कंपनीचे पोस्टर कलरचे डबे, दोन चॉकलेट रंगाचे डबे, एक इसेन्सची बाटली तसेच कुल्फी बनविण्याचे विविध साहित्य जप्त केले. प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की पाण्यात पोस्टर कलर मिसळून त्याला दुधाचा रंग दिला जात होता. त्यानंतर त्या बनावट दुधात चॉकलेट कलर आणि इसेन्स टाकून कुल्फ्या तयार केल्या जात होत्या.

या बनावट कुल्फ्या तालुक्यातील ग्रामीण भागात, शहरात तसेच चालत्या रेल्वे गाड्यांमध्येही विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

पोस्टर कलर आणि रासायनिक इसेन्स वापरून तयार केलेल्या कुल्फ्या आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकतात. जलद नफा कमावण्याच्या नादात संबंधितांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणी विनोद प्रकाश कुशवाहा या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या एका लिटर दुधातून साधारण २५०० कुल्फ्या तयार केल्या जात होत्या. एक कुल्फी ३ रुपयांना विक्रेत्यांना दिली जात असून पुढे त्यावर कमिशन लावून बाजारात विक्री केली जात होती. या बनावट कुल्फ्या जागीच नष्ट करण्यात आल्या असून या साखळीत कमिशन घेणारे आणि वितरण करणारे नेमके कोण आहेत, याचाही तपास करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी कारखान्यात असलेल्या सर्व पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सदर इसमाकडे कारखाना चालविण्यासाठी लागणारा परवाना व शॉप ॲक्ट परवानाही आढळून आला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रयोग शाळेत पाठवलेल्या नमुनाचा अहवाल येत नाही व परवाने काढून घेत नाही तो पर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस सदर संशयितास देण्यात आलेली आहे. पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनिय विभागाचे निलेश देवराज, महेंद्र गवळी आदी पोलीस टीम करत आहेत.

इगतपुरीत उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...