Friday, October 2, 2026
HomeनगरSangamner : आता प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी युनिट’

Sangamner : आता प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अमली पदार्थविरोधी युनिट’

आ. अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर व ग्रामीण भागात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या पुरवठा, तस्करी व विक्रीच्या पार्श्वभूमीवर संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वेळोवेळी केली होती. अमली पदार्थांचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक नेमावे, या अवैध धंद्यांना राजाश्रय कोण देत आहे याची चौकशी करावी तसेच दोषींवर विद्यमान कायद्यांतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा केली.

- Advertisement -

राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अमली पदार्थ व्यापार आणि सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या साखळीचा शोध घेऊन तस्करी, पुरवठा आणि विक्री करणार्‍यांवर प्रभावी कारवाई केली जाईल.

संगमनेर तालुक्यातही अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असताना आमदार खताळ यांनी हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात उपस्थित केला होता. युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या या घातक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली होती. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील कारवाई अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार खताळ यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत अमली पदार्थांच्या विक्री, तस्करी व सेवनाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवून युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...