नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाड (Sorapada) येथे होणारा बालविवाह (child marriage) पोलीसांनी रोखला (Police stopped)असून पालकांना समुपदेशन करण्यात आले.
दि.3 मे 2023 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे बालविवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली. श्री.पाटील यांनी अक्क्लकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले.
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत, पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांनी तात्काळ अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे जावून तेथे बालविवाह होणार्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली. 3 मे 2023 रोजी रात्री रितीरिवाजाप्रमाणे विवाह करणार असल्याचे समजून आले. म्हणून अक्षता सेलच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या मुलाच्या व मुलीच्या नातेवाईकांना त्यांच्या जन्म तारखेबाबत विचारपूस करुन आधार कार्डची मागणी केली.
आधार कार्डची पाहणी केल्यानंतर सदर मुलगी 15 वर्षे व मुलाचे वय 18 वर्षे 10 महिने होते. दोन्हीही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलाचे व मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलगी व मुलाच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या व मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी दोन दिवसात दुसरा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर, पोलीस नाईक सुनिल पवार, पोलीस अंमलदार पंकज जिरेमाळी यांनी केली.