Saturday, January 24, 2026
HomeनगरAhilyanagar : निवडणुकीच्या तोंडावर पोलीस दलात मनमानी

Ahilyanagar : निवडणुकीच्या तोंडावर पोलीस दलात मनमानी

कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच प्रभारी बदलण्याचा खेळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प आणि अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाही त्यांना बदलण्याच्या हालचालींनी जिल्हा पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या बदल्यांचे राजकीय तापमान वाढले असून काही अधिकारी देव पाण्यात घालून प्रभारी पदासाठी धडपड करत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. त्यांच्या जागी संभाजी गायकवाड यांना नियुक्ती देण्यात आली. ती नियुक्ती कशी मिळाली हे जगजाहीर आहे. आता तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलणार या चर्चेने जोर धरला आहे. काही अधिकारी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून, विविध पातळींवर पाठपुरावा करून स्वतःला प्रभारी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकार्‍यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो आणि तो पूर्ण होईपर्यंत बदल्या साधारणत: होत नाहीत.

YouTube video player

मात्र, आता कायदा-सुव्यवस्थेचे समाधानकारक काम करूनही काही अधिकार्‍यांना बदलून नव्यांना संधी देण्याच्या हालचालींनी प्रश्न निर्माण केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर बदली आदेश काढले होते. त्यावेळी अहिल्यानगरमधील काही अधिकारी बाहेरच्या जिल्ह्यात गेले. मात्र, निवडणूक संपताच हेच अधिकारी पुन्हा जिल्ह्यात परत आले आणि आज पुन्हा प्रभारी पदासाठी सक्रिय झाले आहेत. महानिरीक्षकांनी त्यांच्यावर दाखवलेली मेहरबानीमुळे हे अधिकारी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. प्रभारी अधिकारी ठरविण्याचा अधिकार अधीक्षकांकडेच असल्याने त्यांनी राजकीय दबाव आणि लॉबींच्या खेळांपासून दूर राहून सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.

खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप ?
पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी काही खासगी व्यक्ती जास्त हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सध्या अधिकारी वर्गात सुरू आहे. पोलीस दलात खासगी काम करणारी ही व्यक्ती काही पोलीस अधिकार्‍यांच्या संपर्कात असून त्यांनी बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करणे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

तोफखान्यावर गडकरींचा डोळा
तोफखाना पोलीस ठाण्याचा कार्यभार निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हाती असून त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. त्यांच्या काळात ठाण्याची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. मात्र, जिल्ह्यात पुन्हा बदलून आलेल्या व सध्या सुपा ठाण्याचा पदभार सांभाळणार्‍या महिला निरीक्षक ज्योती गडकरी यांना पुन्हा तोफखान्यात प्रभारी होण्याची अपेक्षा आहे.

एमआयडीसीसाठी स्पर्धा तीव्र
भिंगार कॅम्प, नगर तालुका ठाण्यात काम केलेले सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. मात्र, सध्या तेथे कार्यरत माणिक चौधरी यांचा कार्यकाळ संपलेला नाही. देशमुख यांच्यासह गणेश वारूळे आणि हेमंत थोरात हेही या शर्यतीत असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...