Saturday, March 29, 2025
Homeनंदुरबारपोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह थांबला

पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह थांबला

नंदुरबार । Nandurbar

येथील पोलीस मुख्यालयातील अक्षता सेलच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जावून होणारा बालविवाह (child marriage) रोखला.

- Advertisement -

दि.30 मार्च 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना चाईल्ड लाईन नंदुरबार या संस्थेमार्फत माहिती मिळाली की, अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा, काठी येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे. श्री.पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत अक्षता सेलला अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जावून सदर बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले.

अक्षता सेलच्या प्रमुख सहाय्यक, पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे व त्यांच्या पथकाने तात्काळ अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जावून तेथे पोलीस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्य ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा स्वंयसेविका यांच्या मदतीने बालविवाह होणार्‍या अल्पवयीन मुलीची माहिती काढली.

सदर अल्पवयीन मुलीची माहिती घेतली असता सदर अल्पवयीन मुलगी 14 वर्षे 2 महिने वयाची होती. तिचा विवाह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याच्या देवरुखली गावातील राहणार्‍या युवकासोबत आज दि. 30 मार्च 2023 रोजी निश्चित करण्यात आला होता. परंतु त्यापुर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेल व मोलगी पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व इतर नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलींना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच मोलगी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस अल्पवयीन मुलीच्या पालकांना देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदर बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यात असलेली बालविवाहाच्या मोठी समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे, अक्षता सेलचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, पोलीस अंमलदार अभिमन्यू गावीत, दिपक न्हावी, अरुणा मावची, वालंबा काठी गावाचे सामाजिक कार्यकर्ते धीरसिंग पाडवी, ग्रामसेवक शांतीलाल बावा, अंगणवाडी सेविका श्रीमती शिवाजीबाई पाडवी यांनी केली आहे.

पालकांनी मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. बालविवाह करणार्‍या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणार्‍या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...