Friday, May 3, 2024
Homeनगरपॉलिसीवाले बंद करा; शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

पॉलिसीवाले बंद करा; शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

पॉलिसीवाल्यांच्या त्रासापासून भाविकांना मोकळा श्वास मिळावा ः आ. विखे

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या पुण्यभूमीत जगभरातून लाखो भाविक येत असून त्यांना पॉलीसी वाल्यांकडून होणार्‍या त्रासापासून मोकळा श्वास मिळावा यासाठी दि. 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत शहरातील सर्व पॉलिसीवाले बंद करण्यात यावेत, असा निर्णय आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

- Advertisement -

रविवार दि. 22 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ज्येष्ठ नेते हिरामण वारुळे, गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, तज्ञ संचालक राम कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, सुजित गोंदकर, हरिश्चंद्र कोते, ताराचंद कोते, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे नूतन अध्यक्ष यादवराव कोते, भाजपचे रवींद्र गोंदकर, दिनकर कोते, अरविंद कोते, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, उत्तम कोते, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, श्याम कोते, विकास गोंदकर, गजानन शेर्वेकर, सचिन शिंदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शुक्रवार दि. 20 रोजी शिर्डी ग्रामस्थांच्या ग्रामसभेत झालेल्या विषयांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी यांना या बैठकित आमंत्रित करून संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकार्‍यांना आ. विखे यांनी सूचना केल्या. यावेळी शिर्डी शहरातील संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतुकीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली असून आ. विखे यांनी महामार्गावर निमगाव बाह्यवळण ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या. तसेच त्या ठिकाणी विविध भाषेतील फलक लावण्यात यावे.

या फलकावर नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. वाहतूक पोलिसांनी स्वागत कमानीजवळ वाहने तपासावी, असे सांगून शहरात येणारा साईभक्त हा आसपासच्या शहरात राहणे पसंत करीत असल्याचे सांगत हे शिर्डीकरांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.

हाँटेल व्यावसायिकांनी अल्पवयीन मुला-मुलींना रुम देऊ नये. यामध्ये हाँटेल व्यवसायिकांची काही जबाबदारी आहे. नुसतेच पोलीस प्रशासनाला दोष देण्यात काय अर्थ, असे सांगून शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी एक वेबसाईट तयार करावी व मोठ्या शहरातील एजन्सीबरोबर संपर्क करून स्टार कॅटेगिरीचा अवलंब केल्यास हॉटेलमध्ये सुसूत्रता येईल. ग्रामस्थांनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी. जेणेकरून गावातील समस्या गावकर्‍यांना सोडवता येईल. प्रसादालयासमोर उभ्या राहणार्‍या रिक्षावाल्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. आपला व्यवसाय आपण प्रामाणिक ठेवा. एकमेकांच्या स्पर्धेमुळे अपप्रवृत्तीला खतपाणी घातले गेले.

सध्या शहरात वेश्या व्यवसाय संदर्भात गांभीर्याने विचार करायला पाहिजे. यामध्ये पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत त्यांचे कर्तव्य पार पाडत आहे. प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांची बैठक घेण्यात यावी, असे सूतोवाच आ. विखे यांनी केले. दरम्यान मटका आणि दारू धंदे सुरू असलेल्या शहरातील 42 ठिकाणे बेकायदेशीर असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी यावेळी माहिती सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या