Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याChhagan Bhujbal : 'असा' आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : ‘असा’ आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिवसेना भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. एरवी सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांची राजकीय वाटचाल अत्यंत रोमहर्षक आहे. ती पुढीलप्रमाणे…

भुजबळ यांचा जन्म – १५ ऑक्टोबर, १९४७ साली नाशिक येथे झाला. मुंबईतील व्ही. जे. टी. आय. मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतला.

१९७३ मुंबई महापालिकेवर निवड झाली. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता पद मिळाले. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर पद भूषविले. १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर होण्याची संधी मिळाली.

मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केले आहे. वांद्रे – मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना त्यांनी केली.

१९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री, एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद भूषविले.

१८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद त्यांनी सांभाळले.

२००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री पद भूषविले. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

२००९ मध्ये दुसऱ्यांदा तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली.

१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान भुजबळ यांना मिळाला.

1980 आणि 1986 मध्ये भुजबळ यांनी व्यापक परदेशी दौरा केला. त्यांनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, स्वित्झरलँड आणि रशिया या देशांना भेटी दिल्या.

महापौर असताना त्यांनी 1990 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच ओसाका, जपान येथे 1990 साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासह ते सहभागी झाले.

ऑक्टोबर 2000 मध्ये भुजबळ यांनी फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने 28 मे ते 18 जून, 2001 या काळात न्यूयॉर्क, जिनीव्हा, लंडन या शहरांचा दौरा केला.

2002 या वर्षी केंद्रीय पर्यटन तसेच नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी मध्य पूर्वेतील तसेच पश्चिम आशियाई देशातील पर्यटकांना भारतात आकृष्ट करण्यासाठी नेलेल्या शिष्टमंडळात श्री.भुजबळ यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार भुजबळ यांनी दि.19 मे ते 24 मे, 2002 या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी या देशांचा दौरा करुन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर भुजबळ यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2002 या कालावधीत अमेरिका,कॅनडा आणि युनायटेड किंगडम या देशांना भेटी दिल्या. तसेच 6 ते 14 नोव्हेंबर,2002 या कालावधीत लंडन येथे भरलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट या जागतिक पर्यटन विषयक प्रदर्शनास भेट देण्यासाठी व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची या प्रदर्शनामार्फत जागतिक पातळीवर प्रसिध्दी करण्यासाठी त्यांनी लंडनला भेट दिली.

भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची छगन भुजबळ यांनी दि. 5 नोव्हेंबर, 2010 रोजी मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांना महात्मा ज्योतीराव फुले यांनी लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवाद ग्रंथ भेट दिला. त्या काळात अद्ययावत माहिती देणारी प्रसारमाध्यमे किंवा साधनसामग्री नसतानाही महात्मा फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील अफ्रो-अमेरिकन जनतेच्या लढयाला अर्पण केल्याची बाब श्री. भुजबळ यांनी श्री. ओबामा यांना सांगितली. त्यावेळी स्वत: ओबामा सुध्दा काही क्षण अवाक झाले आणि ‘इट इज अ ग्रेट-ग्रेट गिफ्ट फॉर मी’ अशा शब्दांत भुजबळ यांचे आभार मानले. अमेरिकेत परतल्यानंतर श्री. ओबामा यांनी श्री. भुजबळ यांना प्रतिभेटीदाखल एक स्वाक्षांकित चांदीचा ग्लास पाठविला.

दि. 11 नोव्हेंबर, 2010 रोजी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली. या फेररचनेमध्ये भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाच्या मंत्री पदाचा कार्यभार कायम ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारीही सोपविण्यात आली.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि. २८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. आज अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भुजबळ यांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सेलेबी

भारताचा तुर्कीला आणखी एक दणका; BCAS ने तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मु काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या वेळी पाकिस्तानला सक्रीय पाठिंबा देणे तुक्री आणि अझरबैजानला महागात...