Saturday, July 27, 2024
Homeनाशिकदेवळालीत राजकीय हालचाली गतिमान

देवळालीत राजकीय हालचाली गतिमान

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

दि. 30 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी ( Deolali Cantonment Board Elections)राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनाही सरसावल्या असून रात्रीच्या पार्ट्यांमुळे वातावरण तापू लागले आहे. त्यातच आचारसंहिताची जोरदार अंमलबजावणी सुरू झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते 2015 मध्ये पक्षीय पातळीवर निवडणुका लढविल्या गेल्या. त्यात 8 पैकी 5 जागा भाजपने तर 1 जागा मित्रपक्ष आरपीआयने जिंकली होती. उर्वरित दोन जागांपैकी 1 जागा शिवसेनेने तर एका जागेवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. सत्ताधारी भाजप-रिपाइंने शिवसेनाला बरोबर घेत यंदा निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे.

याकामी भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून रिपाइंची जबाबदारी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यावर टाकण्यात आल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने खा. हेमंत गोडसे हे आपले उमेदवार निश्चित करत आहेत. भाजप-शिवसेना-रिपाइं युती विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व वंचित आघाडी अशी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही पॅनलकडून उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या दोन्हीही पॅनलकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी चालवली आहे. एकमेकांविरूद्ध तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठिकठिकाणी राजकीय खलबते सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत दोन वेळा पक्षाच्या बैठका झाल्या असून, येत्या 9 तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, शहर अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्यासह पदाधिकारी तयारी करत आहेत. काँग्रेसकडूनही माजी बोर्ड उपाध्यक्ष बळवंत गोडसे, शहर अध्यक्ष जहांगीर शेख हे पक्षाच्या उमेदवारांची चाचणी करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख साहेबराव चौधरी, वंचितचे शहर अध्यक्ष लखन डांगळे हे भाजप -सेना-रिपाइंला कसे रोखता येईल याची रणनीती आखत आहेत. याशिवाय अनेक इच्छुक उमेदवार गेल्या काही वर्षांपासून तयारी करत असल्याने पक्षाचे तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत.

मनसेकडून भास्करराव चौधरी, गोकुळ जाधव हे देखील त्यांचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत.विद्यमान नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत असून जे वॉर्ड महिला राखीव झाले आहेत त्यासाठी कुटुंबातील महिलांना पुढे केले जात आहे. तर जे वॉर्ड पूर्वी महिलांसाठी राखीव होते ते खुले झाल्याने तेथे महिलेचे पती उमेदवारी करणार असल्याचे संकेत मिळत आहे.

सध्या देवळालीत दिवसाबरोबर रात्रीचेही वातावरणात तप्त होत असून गेल्या तीन वर्षापासून बोर्डात लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेचे होणारे हाल तसेच करण्यात येणारा विकास या मुद्यावर निवडणुकीचे राजकीय आखाडे मांडले जात आहे. वॉर्ड क्रमांक 3 व वॉर्ड 7 हे महिला राखीव असल्याने येथील पुरुष उमेदवारांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. यात माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया व बाबूराव मोजाड यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यांच्या वॉर्डात त्यांच्या घरातील महिला उमेदवारी करतात की आपल्या कार्यकर्त्यांना संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढील आठवड्यात देवळालीत बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. 8 पैकी वॉर्ड 1 हा मागासवर्गीय तर वॉर्ड 5 मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. या दोनही वॉर्डावर रिपाई व वंचितने दावा केलेला आहे. तर व्हॅरीड बोर्डाच्या सदस्या व भाजप प्रदेश अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष प्रितम आढाव या येथून भाजपकडून लढण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत कॅन्टोन्मेंट हद्दीत राजकीय हवा चांगलीच तापू लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या