मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “केवळ एका पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब होणे असा अर्थ होत नाही. राज्यात केवळ दोनच साहेब आहेत”. अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. फक्त पक्षाध्यक्ष झालो म्हणून कोणी साहेब होत नाही असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत. एक शरदचंद्रजी पवारसाहेब आणि दुसरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते. फक्त एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसऱ्याच्या जीवावर नव्हे तर स्वत:च्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणं म्हणजे पवारसाहेब असणं आहे आणि हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांनी सांगण्याची गरज नाही,” अशा शब्दांत कोल्हे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
पुण्यातील खेड येथे अजित पवारांच्या पक्षाने गुरुवारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले होते, “राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार”. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, “अजित पवारांना खरे साहेब कोण आहेत हे चांगलेच माहिती आहे. आपणच साहेब हे अजित पवारांनी च्येष्ठेने केलेले वक्तव्य असेल. राज्यात फक्त शरद पवार व बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब आहेत”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा