नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सर्व राजकीय अडथळे पार करून आणि सत्तास्थापनेचा आठवडाभर चाललेला पेच संपुष्टात आणून, चित्रपट सुपरस्टार ते राजकारणी असा प्रवास करणारे चंद्रशेखर जोसेफ विजय यांनी आज (दि.१०) रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Tamil Nadu CM Oaath) घेतली. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यास काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक, नेते उपस्थित होते.
दरम्यान, अभिनेता विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जमलेल्या जनतेने टाळ्या शिट्या वाजवून एकच जल्लोष केला. यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ (oath) घेत असताना त्यांचे आई वडील (Mother and Father) भावूक झाल्याचे बघायला मिळाले. विजय यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनी (Ministers) मंत्रीपदाची शपथ घेतली.
कोणत्या नऊ मंत्र्यांनी घेतली शपथ?
जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर टीव्हीकेचे आमदार थिरू एन.आनंद यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. ते विजय यांच्या जवळचे मानले जातात. यानंतर तामिळनाडूतील विल्लिवाक्कम मतदारसंघाचे आमदार अधव अर्जुन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ते बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष असून त्यांनी डीएमकेचे कार्तिक मोहन यांचा पराभव केला. याशिवाय टीव्हीकेचे महासचिव अरुण राज, सेंगोत्तैयन, पी. वेंकटरामन, टीव्हीकेच्या सोशल मीडिया टीमचे उपाध्यक्ष आर.निर्मल कुमार, टीव्हीकेचे उपसचिव राजमोहन, आमदार सेल्वी एस. कीर्तना आणि डॉ. टी.के. प्रभू यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
विश्वासदर्शक ठराव
राज्यपाल व्ही. आर. आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले असून, १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी नवनियुक्त आमदारांचा शपथविधी होईल आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होऊन फ्लोअर टेस्ट पार पडेल.
सत्तेचे गणित
टीव्हीके : १०७ आमदार (विजय दोन जागांवरून विजयी झाल्यामुळे तांत्रिक आकडा).
पाठिंबा देणारे पक्ष : काँग्रेस (५), माकप (२), भाकप (२), व्हीसीके (२) आणि आययूएमएल (२).
एकूण संख्याबळ : १२०





