नवी दिल्ली | New Delhi
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (Bhartiy Janta Party) पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. विविध राज्यांचे प्रभारी आणि सह-प्रभारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा २४ नवीन संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी व राज्यसभा खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अजय जामवाल आणि सतीश धोंड यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
या संघटनात्मक फेरबदलांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) पक्षसंघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात अजय जामवाल (Ajay Jamwal) यांची महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सतीश धोंड यांची महाराष्ट्राचे सह-सरचिटणीस म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमधील भाजपच्या आदिवासी संपर्क मोहिमेचे प्रभारी म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रमुख राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) यांच्या जबाबदाऱ्या
पक्षाने काही ज्येष्ठ नेत्यांकडे विविध राज्यांच्या संघटनात्मक कामकाजाची धुरा सोपवली आहे. यामध्ये राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांमधील संघटनात्मक कामकाजाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) सौदान सिंह यांच्यावर बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशसारख्या (Uttar Pradesh) मोठ्या राज्यासाठी धर्मपाल यांची राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर राज्यांतील महत्त्वाच्या नियुक्त्या
तसेच मधुकर यांची दोन्ही राज्यांचे सरचिटणीस म्हणून, तर दशरक्ष यांची तेलंगाणाचे सह-सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रवींद्र राजू यांची आसाम व त्रिपुरा राज्यांसाठी सरचिटणीस (संघटना) आणि कार्यालय उभारणीचे प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे.याशिवाय भिखूभाई दलसानिया (बिहार), पवन साई (झारखंड), सिद्धार्थन (हिमाचल प्रदेश), आणि रत्नाकर यांची गुजरातचे राज्य सरचिटणीस (संघटना) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



