मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाते, याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव आघाडीवर आहे. उद्या (सोमवारी) या जागेवरील अधिकृत उमेदवाराची घोषणा होऊ शकते.
काल (शनिवारी) मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. मात्र, भुजबळ यांच्याकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याचे समजते.
छगन भुजबळांनी कोणती अट ठेवली?
मंत्री छगन भुजबळ यांनी ‘मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता समीर भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागते का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
नवनीत राणा यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने देखील दावा केला होता. भाजपकडून या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार देत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, अशी अट घातल्याचे बोलले जाते. यानंतर आज (रविवारी) नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा झाली.
येवल्यात पोटनिवडणूक लागणार?
छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला मतदारसंघात (Yeola Constituency) पोटनिवडणूक लागेल. या निवडणुकीसाठी भुजबळ यांच्याकडून त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. त्यामुळे आता छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.




