मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ‘तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ… महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असे म्हणत महाराष्ट्राला आव्हान दिले होते. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानतंर आता दुबे यांना राज्यातील महिला खासदारांनी (MP) चांगलाच इंगा दाखवला आहे.
काल (बुधवारी) संसदेचे कामकाज संपल्यानंतर लॉबीमध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांनी गाठत त्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाही, असे म्हणत काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना सुनावले.
दरम्यान, यानंतर वर्षा गायकवाड यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असे म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले. यावेळी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार देखील आजूबाजूला उपस्थित होते, अशी माहिती खासदार गायकवाड यांनी दिली. तसेच या खासदारांनी देखील निशिकांत दुबे यांना जाब विचारला. त्यावर दुबेही निरुत्तर होऊन गपगुमान निघून गेले, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय आहे?
हिंदीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणार नाही, असे म्हटल्याने हात उचलला. यावरुन निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. आमच्या भागात येऊन दाखवा, पटक पटक के मारेंगे अशी भाषा दुबेंनी वापरली होती. त्यावर दुबे यांनी हिंमत असेल तर तू मुंबईत येऊन दाखव. समंदर में डुबे डुबे के मारेंगे, असं प्रतिआव्हान राज ठाकरेंनी दिले होते. यानंतर राज ठाकरेंनी निशिकांत दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावं, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबवून मारु, असं म्हटले होते.




