नाशिक | Nashik
दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह इतर राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरु केली असून, दिवाळीपूर्वीच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) एका एज्युकेशन सोसायटीच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आणि इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पंचायत समित्या व जिल्हा परिषदा उभ्या केल्या. त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचले”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांपासून आपल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होणे गरजेचे होते. परंतु, आता २०२५ उजाडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका (Elecction) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना (OBC) २७ टक्के आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळणार असून, त्यांनी काम करुन दाखवावे”, असेही अजित पवारांनी म्हटले.
एज्युकेशन सोसायटीमुळे अनेक मुले घडतात
कळवण, सुरगाणा, पेठ हा डोंगरी, आदिवासी भाग असून, येथील एज्युकेशन सोसायटीमुळे याठिकाणी अनेक मुले घडत आहेत. ३५ वर्षांपासून मी खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. मी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना मोठा निधी शिक्षण विभागाला देत असतो. पुढची पिढी घडावी यासाठी शिक्षण संस्था सुरू राहणे गरजेची आहे. यासाठी विविध संस्थांनी पुढे येऊन निधी द्यावा, असे आवाहनही अजित पवारांनी उपस्थितांना केले.