नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
दिल्लीच्या मुख्यमंत्री (Delhi CM) रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या सरकारी बंगल्यावर (Government Bungalow) जनता दरबार सुरू असताना हा हल्ला करण्यात आला असून, पोलिसांनी (Police) हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता सीएम सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी जनता दरबार घेत होत्या. त्यादरम्यान गर्दीतून एका ३५ वर्षीय व्यक्तीने उभे राहून मुख्यमंत्र्यांना एक कागद दिला. मुख्यमंत्र्यांना काही समजण्यापूर्वीच त्या व्यक्तीने त्यांना कानाखाली मारली. त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्याचे केस ओढले आणि त्यांना चापट मारली. सुदैवाने या घटनेत त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.
तसेच डॉक्टरांचे (Doctor) एक पथकही गुप्ता यांच्या निवासस्थानी (Residence) पोहोचले. तर घटनेनंतर लगेचच जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले आणि पोलिसांकडे दिले. ती व्यक्ती कोण हीता आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे शोधले जात आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता बऱ्याच काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या (BJP) सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत.
लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल – वीरेंद्र सचदेवा
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. हा प्रकार अचानक झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने हा प्रकार का केला याची संपूर्ण माहिती लवकरच समोर येईल असे सचदेवा यांनी म्हटले.




