मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीकडून झालेली बेकायदेशीर जमीन खरेदी, नाशिकच्या तपोवनमधील (Tapovan) वृक्षतोडीच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन, साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्यांवर होत असलेले आरोप, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, अतिवृष्टीग्रस्त बाधितांच्या मदतीवरून निर्माण झालेला संभ्रम या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) फडणवीस सरकारची कसोटी पाहणारे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील विशेषतः भाजप आणि शिंदे गटात उडालेल्या संघर्षाचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा तसेच ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा लवकरच अपेक्षित आहे.मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या तोंडावर उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. स्थानिक निवडणुकांमुळे अधिवेशन जेमतेम आठवडाभर म्हणजे १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२५-२६ या वर्षातील पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. तसेच पंधराव्या विधानसभेचे सदस्य आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाऊन पहिल्या दिवशीचे कामकाज संपेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुढील सहा दिवस हे अधिवेशन कामकाजाचे असणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सरकारमधील मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर गैरव्यवहाराचे (Scam) आरोप होत आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील सरकारी जमीन कवडीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केली आहे. जमीन घोटाळा उघड झाला तेव्हाच विरोधी पक्षाने अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता अधिवेशनात विरोधी पक्ष ही मागणी रेटून धरण्याची शक्यता आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर नवी मुंबईतील सिडकोच्या जमीन घोटाळ्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात सरकारने चौकशी समिती नेमली असली तरीही पवार यांच्याप्रमाणे शिरसाट हे सुद्धा विरोधी पक्षाचे लक्ष्य ठरण्याची चिन्हे आहेत.
नाशिक महापालिका (Nashik NMC) प्रशासनाने आगामी कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नाशिकमधील नागरिकांचा विरोध आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्ष तोडीला विरोध केला आहे. तर साधुग्रामसाठी काही झाडे कापावीच लागतील, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. वृक्षतोडीवरून सरकारमधील मतभिन्नता समोर आल्याने विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडू शकतो. याशिवाय बीडमधील शेकडो कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुद्दा विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
आत्महत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणी सरकारने विशेष तपास पथक नेमले असले तरीही विरोधी पक्ष या प्रकरणावरून आक्रमक होण्याचे संकेत आहेत. याशिवाय वरळी येथील डॉ. गौरी गर्जे-पालवे मृत्यू प्रकरण, नांदेडमधील आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची झालेली हत्या तसेच नाशिक, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांवरून सरकारला विरोधी पक्षाच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते.
निवडणूक आयोगावर नाराजी
अवघ्या ४८ तास आधी राज्यातील २४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतींची लांबणीवर पडलेली मतमोजणी, मतदार यादीतील गोंधळ, महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रभागनिहाय करण्यात आलेली विभागणी यामुळे टीकेचा धनी बनलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधातील नाराजी अधिवेशनात व्यक्त केली जाऊ शकते. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोगाच्या कारभारात सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो.
विधिमंडळाची दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेतेविना
विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाला सध्या विरोधी पक्षनेता नाही. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठक होऊन अधिवेशनातील रणनीती निश्चित केली जाते. अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित केले जातील, याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली जाते. मात्र, आता विरोधी पक्षनेताच नसल्याने विरोधकांच्या बैठकीविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, या अधिवेशनात विरोधकांकडून दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या नावांना मान्यता देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव तर काँग्रेसने विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





