Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयMalegaon MC Election : उमेदवारांच्या मांदियाळीने निवडणुकीत चुरस; स्वपक्षीय बंडखोर-अपक्षांमुळे यशासाठी राजकीय...

Malegaon MC Election : उमेदवारांच्या मांदियाळीने निवडणुकीत चुरस; स्वपक्षीय बंडखोर-अपक्षांमुळे यशासाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणास

मालेगाव | हेमंत शुक्ला | Nashik

शहरातील राजकीय प्रभुत्व सिध्द करण्यासाठी महानगरपालिका (Mahapalika Election) सभागृहात प्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात पुन्हा उडी घेतली आहे. या नेत्यांचा विजयाचा मार्ग रोखण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे देखील मातब्बरांना मैदानात आणण्यात आले आहे. तर उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज असलेल्यांनी ‘बंडा’चा पवित्रा घेत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या अविर्भावात प्रचाराची धुमशान उडवून दिली असल्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यामुळे नेते पदाधिकारी उमेदवारी करत असलेल्या प्रभागात पक्षाच्या वर्चस्वासाठी वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्ते देखील सक्रिय झाल्याने निवडणुकीचा फड आता रंगू लागला आहे.

- Advertisement -

मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक (Malegaon Municipal Corporation Election) रणसंग्रामास खऱ्या अथनि प्रारंभ झाला आहे. जनसंपर्क-प्रचार रॅल्यांनी शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. २१ प्रभागातील ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विविध पक्षांच्या २२९ उमेदवारांसमोर बहुतांश प्रभागात ७२ अपक्ष व काही बंडखोरांनी मैदानात उतरत तगडे आव्हान उभे केले आहे. निवडणूक लढवत नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारे सक्षम कार्यकर्ते गत अनेक वर्षापासून प्रभागात कार्यरत होते. मात्र, नेत्यानेच उमेदवारी नाकारल्याने व निष्ठावंत राहून देखील काही ठिकाणी दुसऱ्यांना संधी दिली गेल्याने संतप्त झालेल्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. यामुळे नेते व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उमेदवारी करत असलेल्या प्रभागांमध्ये बंडखोर अपक्षांमुळे होवू पाहणारी मतविभागणी अनेकांसाठी त्रासदायक ठाण्याचे चित्र आता दिसू लागले आहेत.

YouTube video player

बंडखोर-अपक्षांच्या उमेद्वारीने होत असलेली मतविभागणी पक्षाच्या उमेदवारास अडचणीची ठरू शकत असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांची आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रतिष्ठापणास लागली आहे. अपक्षांमुळे होणारे ‘डीज’ कंट्रोल करण्यासाठी त्यामुळे नेते पुढे सरसावले आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने, युवा सेना नेते अविष्कार भुसे, एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती, इस्लाम पार्टी संस्थापक माजी आमदार आसिफ शेख, भाजप नेते अब्दय हिरे, बंडुकाका बच्छाव, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, माजी महापौर ताहेरा शेख रशीद, समाजवादी पार्टी महानगरप्रमुख शानेहिंद निहाल अहमद, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, काँग्रेस महानगरप्रमुख एजाज बेग आदी नेते स्वतः जातीने प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रभागातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याबरोबर ‘एकगठ्ठा’ मत ओडू शकणारे कार्यकर्ते असो की परिवार त्यांच्याशी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी स्वतः संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे.

दुहेरी-बहुरंगी लढतींमुळे चर्चेतील प्रभाग

प्रभाग १ ‘अ’ मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना व आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया या महिला उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत तर ‘ब’ व ‘क’ मध्ये सेना भाजपमध्ये दुरंगी लढत होत आहे. तर ‘ड’ मध्ये शिवसेना, भाजप, उबाठा व वंचित आघाडीत चौरंगी सामना होत आहे. प्रभाग २ मध्ये चौरंगी व तिरंगी लढत होत आहे. प्रभाग ३ अ मध्ये समाजवादी पार्टीच्या महानगरप्रमुख शानेहिंद निहाल अहमद व एमआयएमच्या शमीमबानो यांच्यात थेट दुरंगी लढत होत आहे. प्रभाग ४ क मध्ये स्व. आमदार शेख रशीद यांचे बंधू शेख जलील इस्लाम पार्टीतर्फे रिंगणात उतरले असून त्यांचा एमआयएमचे मोहंमद लुकमान यांच्याशी दुरंगी सामना रंगला आहे. ड जागेवर इस्लामचे उद्धव दरेकर व एमआयएमचे विशाल अहिरे यांच्यात होत असलेल्या दुरंगी लढतीत मोहंमद ओमेर या अपक्ष उमेदवाराने मैदानात उत्तरत रंगत आणली आहे.

प्रभाग ७ ड मध्ये समाजवादी पार्टीचे युवा प्रदेश सरचिटणीस मुस्तकीम डिझेटी यांच्यासमोर एमआयएमचे अब्दुल माजीद व काँग्रेसचे रईस सत्तार यांनी आव्हान उभे केले आहे. मोहंमद इस्माईल या अपक्ष उमेदवारामुळे होणारी मत विभागणी निवडणुकीची रंगत वाढवणारी ठरली आहे. प्रभाग ८ अ मध्ये माजी नगरसेवक रिजवान अमानतउल्ला खान यांनी अपक्ष उमेदवारी करत इस्लाम पार्टीचे निहाल अहमद मो. सुलेमान यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. अपक्ष उमेदवारामुळे या जागेवर देखील तिरंगी लढत होत आहे. संगमेश्वरासह शहराचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रभाग ९ ‘अ’ मध्ये सामना होत असून दोघा अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. ‘ब’ जागेवर माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या पत्नी लता घोडके या सेनेतर्फे तर भाजपतर्फे राजश्री गिते या रिंगणात उत्तरल्या आहेत. राष्ट्रवादी तर्फे प्रियंका सोनवणे व भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार दीपाली वारूळे यांच्या उमेदवारीने या जागेवर अटीतटीची लढत होत आहे. ‘क’ जागेवर माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. भाजपतर्फे माजी नगरसेवक गुलाब पगारे, उबाठा शिवसेनेतर्फे कैलास तिसगे हे तर वंचित आघाडीतर्फे अमोल मोरे मैदानात उतरले असतांना दोघा अपक्ष उमेदवारांमुळे या प्रभागातील निवडणूक देखील चुरसपुर्ण होणार आहे.

प्रभाग १० अ मध्ये सेना, भाजपमध्ये दुरंगी तर ब मध्ये भाजप महानगरप्रमुख देवा पाटील व शिवसेनेचे दिनेश ठाकरे यांच्यात दुरंगी लढत होत असतांना भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार बाळासाहेब अहिरे व काँग्रेसचे मयूर बद्रि मैदानात उतरल्याने या जागेवर देखील होत असलेली मत विभागणी निवडणुकीत रंगत आणणारी ठरली आहे. ‘क’ जागेवर भाजप, सेना व राष्ट्रवादीश.प. असा तिरंगी सामना रंगला आहे. तर ड जागेवर भाजप गटनेते सुनिल गायकवाड व शिवसेनेचे विशाल पवार यांच्यात दुरंगी लढतीत काँग्रेसचे मोहन कांबळे, उबाठाचे शेख आसिफ अफजल व भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार नितीन पोफळे, अपक्ष उमेदवार बिनोदकुमार मित्तल, रामलिंग त्रिमुखे यांच्या उमेदवारीने संपुर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे वेधले गेले आहे.

प्रभाग ११ अ, ब व क या तिघा जागेवर सेना, भाजपमध्ये दुरंगी लढत तर ड जागेवर सेना, भाजप व उबाठामध्ये तिरंगी लढत होत आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे समर्थक माजी उपमहापौर निलेश आहेर व भाजप गटनेते सुनिल गायकवाड यांचे पुत्र दीपक गायकवाड यांच्यात सामना रंगला असला तरी उबाठा उमेदवार पंकज पाटील यांची उमेदवारी मत विभागणीस निमंत्रण देणारी ठरली आहे. प्रभाग १२ अ मध्ये पुनम बसावे शेलार भाजप व अंजना दाभाडे सेना यांच्यात दुरंगी लढत तर ब जागेवर उमेश चौधरी शिवसेना, सुनिल चौधरी भाजप व दीपक बच्छाव राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होत आहे. क जागेवर सेना, भाजप, बसपा, वंचित आघाडी अशी चौरंगी लढत रंगली आहे. तर ड जागेवर भाजपचे माजी नगरसेवक मझबापू गायकवाड व शिवसेनेचे महानगरप्रमुख विनोद वाघ यांच्यात लढत रंगली आहे. बसपाचे सुनिल पवार व अपक्ष उमेदवार कपिल अहिरे यांची उमेदवारी देखील कुणाचा विजयी रथ थांबवते याची उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे.

प्रभाग तेरा, चौदा, पंधरा मध्ये दुरंगी तर सोळा मध्ये तिरंगी लढत होत आहे. १६ अ मध्ये तिशी तर ब मध्ये माजी महापौर इस्लाम पार्टीच्या ताहेरा शेख रशीद यांची एमआयएमच्या महजबीन बानो यांच्याशी दुरंगी सामना रंगला आहे. राष्ट्रवादी श.प.च्या रईसा शेख यांच्या उमेदवारीने होत असलेली मत विभागणी निवडणुकीत रंगत आणणारी ठरली आहे. प्रभाग १८ अ मध्ये महानगरप्रमुख एजाज बेग यांच्यासमोर एमआयएमचे गुलनार फजल अहमद, इस्लामचे हाफिज अनीस अजहर मिल्ली उभे ठाकल्याने तिरंगी लढत होत आहे. सादिया कौसर या अपक्ष उमेदवाराने या जागेवर रंगत आणली आहे. प्रभाग १९ क मध्ये एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मालिक व वंचितचे वहबूद अब्दुल खालीक तसेच एमआयएम बंडखोर माजी नगरसेवक अपक्ष साजीद मोहंमद असा तिरंगी सामना रंगला आहे. प्रभाग २० व २१ मध्ये देखील दुरंगी व तिरंगी लढत रंगली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...