मुंबई | Mumbai
आगामी महापालिका निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पक्षाच्या शाखाध्यक्षांसोबत मुंबईत (Mumbai) बैठक पार पडली. या बैठकीत मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळ यावरुन राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता कबुतरखाना बंदीसह १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्यावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “सध्या मुंबईतील दादर (Dadar) येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागले पाहिजे. न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी देखील त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे तरीही कबुतरांना खायला घातले जाणार असेल तर पोलिसांनी (Police) खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे”, असे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “जेव्हा न्यायालयाचा (Court) आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. न्यायालयाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केले तेव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली. सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही. निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
तसेच “राज्यात सध्या सुरु असलेल्या कत्तलखाना आणि मांसविक्री बंदीच्या निर्णयावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, ” १५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका. स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी कोणी काय खावं आणि खाऊ नये यावर तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा, स्वातंत्र्यदिनी त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले.




