मुंबई | Mumbai
एसआयआर यादीतील (SIR List) घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील गोंधळामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने आंदोलने केले जात असून, हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड केली जात असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे.
अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंदोलनाला दाबण्यासाठी आणि आंदोलकांना रोखण्यासाठी ‘नकली पोलीस’ उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.खासदार राऊत यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात एका गाडीत मोठ्या प्रमाणावर खाकी गणवेश (पोलीस वर्दी) आणि शर्ट्सचे बंडल भरलेले दिसून येत आहेत.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आंदोलनावेळी (Protest) पोलिसांनी आंदोलनाकर्त्यांना दिलेल्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तसेच याबाबत पोलिसांकडून (Police) अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
संजय राऊतांनी पोस्टमध्ये काय म्हटले?
या प्रकराबाबत बोलताना राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की,”दिल्लीतील ज्ञानेश कुमार आंदोलनातील ट्विस्ट.ज्या पोलिसांना रस्त्यावर गुंडागर्दी करताना पाहिले,महिला मुलींवर हात टाकताना दिसले, ते भाजपचे (अमित शहा) नकली पोलिस होते,भाडोत्री गुंडांना खाकी गणवेश देऊन आंदोलकांना रोखण्यासाठी उतरवले होते. दिल्लीत आंदोलनाच्या आसपास खाकी पोलिस वर्दी ने गच्च भरलेल्या गाड्या होत्या कोणासाठी? नेमप्लेट शिवाय जे पोलिस दिसत होते ते अशी वर्दी घातलेले गुंड होते हाच राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पैटर्न आहे! उघडा डोळे आणि बघा नीट! असे ते म्हणाले आहेत.
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
खासदार राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका चारचाकी वाहनाचा (गाडीचा) दरवाजा उघडलेलाअसून, त्या गाडीच्या सीटांवर खाकी रंगाचे गणवेश, तसेच लष्करी/पोलीस पॅटनचे बंडल मोठ्या प्रमाणावर भरलेले दिसत आहेत. या वाहनामध्ये एकामागोमाग एक असे खाकी गणवेशांचे गठ्ठे रचून ठेवल्याचे दिसत आहे.




