मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (NCP Ajit Pawar Party) यांच्या पक्षाला नागालँडमध्ये (Nagaland NCP) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सात आमदारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ (CM Nephew Rio) यांच्या नेतृत्वातील पक्षाला आता विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. तर नागालँडमध्ये (Nagaland) आता राष्ट्रवादी काँग्रेस शून्यावर आली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी (NCP MLA) प्रवेश केल्यामुळे एनडीपीपीच्या आमदारांची (NDPP MLA) संख्या २५ वरून ३२ वर पोहोचली आहे. त्यामुळे एनडीपीपीला आता भाजपच्या समर्थनाची गरज भासणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नागालँडच्या सातही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. यानंतर २०२३ मध्ये झालेल्या नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यावेळी पक्षाचे सात आमदार निवडून आले होते. परंतु, आता हे सातही आमदार सत्ताधारी एनडीपीपी आघाडीत सहभागी झाले आहेत.
All seven NCP MLAs in Nagaland join CM Neiphiu Rio-led NDPP
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2025
दरम्यान, नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीत सहभागी होत असल्याची पत्रे सादर केली. हे विलीनीकरण भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक आवश्यकता पूर्ण करते. तसेच सर्व सात आमदारांनी एनडीपीपी मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची विधानसभेतील (Vidhansabha) संपूर्ण विधानपक्षाची रचना बदलली आहे.
पक्षाने घेतली गंभीर दखल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी एनडीपीपी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार या आमदारांवर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी पक्षाला जो जनादेश दिला त्याचा हा अपमान आहे. आमदारांचे नेमकं काय म्हणणे होते. त्यांनी हा निर्णय का घेतला याची माहिती घेण्यासाठी आमदारांशी चर्चा करणार असल्याचेही श्रीवास्तव म्हणाले.




