मुंबई | Mumbai
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे (Rahul Gandhi) निकटवर्तीय दिवंगत राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav Joins BJP) या उद्या (दि.१८ डिसेंबर) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव २०२१ मध्ये पहिल्यांदा पोटनिवडणुकीत विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासाठी भाजपने (BJP) माघार घेतली होती. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा सातव विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनानंतर हिंगोलीत काँग्रेसची पकड कमजोर झाली आहे. त्यामुळे उद्या जर प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास हिंगोलीत काँग्रेसला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे.
राजीव सातव नेमके कोण होते?
दिवंगत राजीव सातव यांची राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे ते प्रचंड चर्चेत आले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषविली होती.
प्रज्ञा सातव यांची राजकीय वाटचाल
प्रज्ञा सातव या सध्या विधानपरिषदेवर आमदार असून ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली आहे. त्या तसं पाऊल उचलतील असं वाटत नाही. ही बातमी निराधार आहे. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. त्या असं कोणतंही पाऊल उचलतील असं मला वैयक्तिक वाटत नाही, असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले.




