मुंबई | Mumbai
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत (NCP Merger Rumors) सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार गटाचे २० ते ३० आमदार फुटणार असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपासून संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, कल्पोकल्पित कथा रचणे आणि सकाळी नॅरेटिव्ह सेट करणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे, असा टोला तटकरे यांनी लगावला.
यावेळी ते म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्ष (NCP Party) पूर्णपणे एकसंघ असून पक्षाचे सर्व आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करत आहेत. कोणीही फुटणार नाही, असे स्पष्ट करत तटकरेंनी राऊतांचा दावा फेटाळला. तसेच राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी कालच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, ज्यावेळी जे असेल त्यावेळी ते समोर येईल. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांच्या भेटीवर स्पष्टोक्ती
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, “शरद पवार आमचे दैवत आहेत, त्यांनी आम्हाला घडवले आहे. त्यांनी ६ दशके देशासाठी व राज्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोणी आमदार भेटायला जात असेल किंवा मुंबईत असताना मी स्वतः त्यांना भेटायला जाणार असेल, तर त्यात काहीही गैर नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे”, असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर काय म्हणाले?
दरम्यान, मंगळवारी सुनेत्रा पवारांसोबत (Sunetra Pawar) दीड तास चर्चा केल्यानंतर सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, “ही पूर्णपणे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि सदिच्छा भेट होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तसेच रोहा शहरातील ५५ कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर मंजूर झालेल्या रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनाला आणि श्रीवर्धन येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या मूळ गावातील स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.




