नाशिक | Nashik
महायुती सरकारचा (Mahayuti Government) मंत्रिमंडळ विस्तार उद्या (रविवारी) नागपूरच्या राजभवनात सकाळी ११ किंवा दुपारी ४ वाजता होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराचे पत्र आज राज्य सरकारकडून नागपूर (Nagpur) येथील राजभवनाला दिले जाणार आहे. सोमवार (दि. १६ डिसेंबर) पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून उद्या भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) नाशिक जिल्ह्याला झुकते माप मिळताना दिसत आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून १, राष्ट्रवादीकडून २ आणि शिवसेनेकडून १ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये भाजपकडून नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) किंवा चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर (Rahul Aher) या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. हे दोन्हीही तीन टर्मचे आमदार (MLA) म्हणून निवडून आले आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. भुजबळ हे मागील काळात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असताना देखील मंत्री होते. त्यानंतर ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत महायुतीमध्ये समील झाल्यानंतर देखील मंत्री झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर मागील काळात विधानसभेचे उपसभापती राहिलेले नरहरी झिरवाळ यांना यंदा मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला राष्ट्रवादीच्या कोट्यातून दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघातील आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. मागील महाविकास आघाडी व महायुती सरकारच्या काळात भुसे हे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते मंत्री होणार आहेत. याशिवाय मागील काळात ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. जिल्ह्यात भुसे यांच्यासह शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले असून यात नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा समावेश आहे. कांदे यांनी देखील पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली होती. तसेच त्यांचे नाशिक शहरात काही ठिकाणी पालकमंत्रीपदाचे फलक देखील लागले होते. मात्र त्यांना मंत्रिपद मिळविण्यासाठी अपयश आल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्रीपदासाठी भुजबळ-भुसे यांच्यात रस्सीखेच
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ आणि दादा भुसे हे मंत्री असताना त्यावेळी भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मविआचे सरकार कोसळून महायुतीचे सरकार आल्यावर दादा भुसे यांना पालकमंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीमध्ये एन्ट्री झाल्यावर भुजबळ यांना पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भुसे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून भुजबळ आणि भुसे मंत्री झाल्यास दोघांमध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.