मुंबई | Mumbai
राज्यासह देशभरातील प्रत्येक घरोघरी आजपासून १० दिवस गणपती बाप्पा (Ganpati Bappa) विराजमान असणार आहे. राजकीय नेतेमंडळी, कलाकार यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले असून, दर्शनासाठी नेत्यांच्या रांगा लागणार आहेत. अशातच आता मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, त्यांच्या ‘शिवतीर्थ’या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज दुपारचे जेवण देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जेवणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray Brotehrs) भेटीगाठी झाल्या आहेत. त्यानंतर आज देखील दोन्ही भावांमध्ये ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट झाली आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काही राजकीय चर्चा होते का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दोन महिन्यात तिसरी भेट
राज आणि उद्धव ठाकरे बंधू काही दिवसांपूर्वी ‘हिंदी सक्ती’ विरोधात वरळी येथे झालेल्या एका जाहीर सभेत एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, “हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है” असे विधान करत भविष्यातील संभाव्य राजकीय युतीचे संकेत दिले होते. यानंतर, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध सुधारत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गणेशोत्सव ठाकरे बंधुंसाठी पुन्हा एकत्र येण्याचे एक महत्त्वपूर्ण निमित्त ठरले आहे.




