मुंबई | Mumbai
राज्यातील सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठी (District Central Cooperative Banks) सोमवारी (दि.०२ नोव्हेंबर) रोजी मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असता सुरुवातीच्या अवघ्या काही तासांतच धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अत्यंत चुरशीचे आणि नाट्यमय निकालात अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला आहे तर काहींचा विजय झाला असून, त्यांनी थाटात जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District Bank) मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघातून ५८ मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या सत्यजित पाटणकर (४६ मते) यांचा पराभव केला. पाटण सोसायटीत तब्बल ४२ वर्षांनंतर देसाई गटाला विजय मिळाला आहे. तर माण सोसायटी मतदारसंघात मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीचे मनोज पोळ (१४ मते) आणि स्वतःचे बंधू, शिवसेनेचे शेखर गोरे (७ मते) यांचा पराभव केला. याशिवाय कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री दोघांनाही प्रत्येकी ४४ मते मिळाल्याने सामना टाय झाला आहे. एक मतपत्रिका बाद ठरवून बाजूला ठेवण्यात आल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, आता विजयाचा निर्णय ईश्वर चिठ्ठीने होणार आहे.
खंडाळा सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजय भोसले २८ मते मिळवत विजयी झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संजीव गाढवे यांना २१ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शामराव गाढवे यांना स्वतःचेही मत न मिळाल्याने शून्य मते पडली. जावळी सोसायटीत भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते मिळवून ३० मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विठ्ठल गोळे यांना अवघी ८ मते मिळाली. महाबळेश्वर सोसायटीत राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी ८ मते मिळवून शिवसेनेच्या संजय मोरे (४ मते) यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव केला. फलटण तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये शिवसेना (शिंदे गट) नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत (Sangli District Bank) तासगाव सोसायटीमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्या मातोश्री सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. सुमनताई पाटील यांना ३८ तर संजयकाका पाटील यांना ४० मते मिळाली. तर कवठेमहांकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे ३७ मते मिळवून १६ मतांनी विजयी झाले. त्यांनी रोहित पाटील गटाच्या टी. व्ही. पाटील (२१ मते) यांचा पराभव केला. याशिवाय मिरज सोसायटीतून खासदार विशाल पाटील यांचे समर्थक अण्णासाहेब कोरे हे ४६ मते मिळवून विजयी झाले आहेत. तसेच जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत (Ahilyanagar District Bank) पारनेर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांनी विखे समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव करत बाजी मारली आहे. लंके यांना १०४ पैकी ६४ मते मिळाली. तर अकोलेतून राम शिंदे यांच्या समर्थक संजीवनी शिंदे यांना ४९ मते मिळाली असून त्यांनी आमदार किरण लहामटे यांचा पराभव केला. त्यांना ३६ मते मिळाली. याशिवाय कर्जतमधून ज्योती प्रकाश शिंदे ५४ मते मिळवत विजय झाले असून, त्यांचे प्रतिस्पर्धी तुषार अंबादास पिसाळ यांना २० मते मिळाली आहेत. तसेच राहुरी गटातून आमदार प्राजक्त तनपुरे ८९ मते मिळवून विजयी झाले असून, त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला १८ मते मिळाली आहेत .




