अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रविवारपासून मतदान यंत्रावर उमेदवारांचे चिन्ह टाकण्यास सुरूवात होईल. त्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करून स्टाँगरूममध्ये ठेवण्यात येतील. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँगरूम 19 नोव्हेंबर रोजी उघडून मतदान यंत्र मतदान केंद्र पथकांना देण्यात येतील. मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान झाल्यावर प्रत्यक्ष मतदानास सुरूवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नीटपणे समजावून घेणे गरजेचे असून निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, ईव्हीएम समन्वयक शारदा जाधव आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण सर्वसमावेशक आणि पारदर्शक असावी यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकवेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि काही शंका असल्यास वेळीच संबंधित अधिकार्यांकडून माहिती घ्यावी. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुक्तपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएम समन्वयक शारदा जाधव यांनी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.
निवडणुकीत कर्तव्यभावनेने काम करा : मिश्रा
विधानसभा निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाने देशाच्या प्रति पवित्र कर्तव्य करण्याच्या भावनेने जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने नियोजन करावे. त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे स्तर निश्चित करून प्रत्येक स्तरासाठी प्रतिसाद देण्यासाठी कालावधी निश्चित करावा. मतदानापूर्वी एक दिवस सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घ्यावा अशा सूचना त्यांनी केल्या. त्यांनी निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.