नाशिक | फारुक पठाण | Nashik
नाशिक शहरातील (Nashik City) अतिक्रमणाचा विषय असो की पाणीपुरवठा तसेच भूसंपादन अशा विविध कामांसाठी नाशिक मनपात (Nashik NMC) शहरातील भाजप आमदार (BJP MLA) येत असून प्रशासनाला त्वरित कार्यवाहीचे आदेश देत आहेत. राज्यात मुख्यमंत्री (CM) भाजपचे असल्याने भाजप आमदारांचे विशेष लक्ष मनपावर असून आमदारांच्या हाती मनपाचा कारभार गेल्याची तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे वजन पूर्वीप्रमाणे मनपात दिसून येत नाही, अशी चर्चा रंगत आहे.
१३ मार्च २०२२ पासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. २०२२ साली महापालिका निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र विविध कारणांनी आतापर्यंत निवडणूक झालेले नाही. दरम्यान, नाशिक महापालिकेवर लोकप्रतिनिधी नगरसेवक नसल्यामुळे आता थेट शहरातील आमदारांनी नाशिक महापालिकेचा कारभार आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपचे आहेत तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असून त्यात भाजपसह शिवसेना समावेश आहे. सध्या नाशिक महापालिकेत (Nashik NMC) भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचीच चलती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीत इतर दोन पक्षांचे नेते विविध कारणांसाठी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करत असल्याचे ऐकायला मिळत आहे.राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे एक आमदार देवळाली मतदारसंघाचे असून हा मतदारसंघ शहरात व ग्रामीण भागात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे कमीच मनपात येतात.
मात्र, मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे आ. डॉ. राहुल ढिकले, नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे हे आता तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नाशिक महापालिकेत जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे व पालमंत्री भुसे होते त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी चलती महापालिकेत पाहायला मिळाली होती. २०२४ च्या निकालानंतर मुख्यमंत्री भाजपचा झाल्यामुळे आता शहरातील तिन्ही भाजपच्या आमदारांनी मनपाचा ताबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.