Monday, October 21, 2024
HomeनाशिकPolitical Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

दिंडोरी | नितीन गांगुर्डे | Dindori

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात (Dindori-Peth Constituency) विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti and Mahavikas Aagahdi) असा सामना दिसण्याऐवजी गटा गटामध्येच लढत रंगेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे गटागटाचे नेतृत्व सक्रिय झाले असून पक्ष काही प्रमाणात बाजूला पडत चालले आहेत. दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यामुळे त्यांनी उभी केलेली ताकद मोडून काढण्याचे प्रचंड आव्हान त्यांच्या विरोधकासमोर असणार आहे. या निवडणुकीत युत्या-आघाड्या जरी दिसत असल्या तरी शेटे गट विरुद्ध डोखळे गट अशीही लढत दिसणार आहे. विधानसभेची मोर्चेबांधणी जोमाने सुरु झाली असून अनेकांपुढे उमेदवारी मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राजकीय पटलावर डोखळे गट विरुद्ध शेटे गट अशाच लढतीची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे जोरदार रस्सीखेच निर्माण होणार आहे. राजकीय साठमारीत कोण बाजी मारेल, याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

या मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांनी शेवटच्या टप्प्यात अनेक विकासकामे मंजूर करून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात विकासकामांना मान्यता मिळविण्यात आ.झिरवाळ यशस्वी झाले. खेडोपाडी अनेक गावांचे रस्ते त्यांनी मंजूर केले. दिंडोरी व पेठ या दोन नगरपंचायतींना त्यांनी निधी मिळवून दिला. ही त्यांची जमेची बाजू राहील. गावोगावी त्यांनी संपर्क मजबूत केला आहे. महायुतीच्या वतीने त्यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. ज्या मतदारसंघात पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्या मतदारसंघाची जागा त्या त्या पक्षाला सोडण्यात येणार आहे असा वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाल्याचे जाहीर झाल्याने दिंडोरीची जागा महायुत्तीकडून राष्ट्रवादीच्या घड्याळाला राहील तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी तुतारीला राहील, असा सर्वसामान्य कयास आहे.

असे असतानाही माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रणशिंग फुंकले आहे. धनराज महाले यांनी दिंडोरी आणि पेठ मतदारसंघात खेडोपाडी प्रचार दौरे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रवेशावेळी तिकिटाचा शब्द दिल्याचे महाले यांचे म्हणणे आहे. जर यदाकदाचित तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचेही संकेत धनराज महाले यांनी दिले आहेत. धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी उमेदवारी केल्यास त्यांना डोखळे गट तसेच महाचिकास आघाडीतील नाराज घटक मदत करू शकतात, अशी चर्चा आहे. भाजपने मात्र वेट अॅण्ड वॉचची भूमिका ठेवली आहे. भाजपचे संघटन मात्र निवडणूक तयारीसाठी सज्ज आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, प्रमोद देशमुख, शाम मुरकुटे आदी पक्ष आदेशाकडे लक्ष देत आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aaghadi) शरद पवार फॅक्टरने जोर धरला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणारा वर्ग तालुक्यात पूर्वर्वीपासून असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला येथे बस्तान बांधता आले. शरद पवार यांचे निष्ठावंत कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील आदींनी यंदाच्या निवडणुकीत व्युहरचना केली आहे. शरद पवार यांच्याकडे राज्यभरातून जोरदार इनकमिंग सुरू आहे. पवार फॅक्टरचा फायदा दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी गट घेण्याच्या तयारीत आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिंडोरी पेठ तालुक्यात ३० हजारांच्या पुढे फिक्स मतदान आहे, माकपचेसुद्धा २० हजारांच्या पुढे फिक्स येते. त्यामुळे मतदान असल्याचे सांगण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पचार गट आणि शिवसेना उद्धब ठाकरे गट, काँग्रेस व माकप यांची एकगड्डा बेरीज केल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.

म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाकडे इच्छुक उमेदवार जास्त आहेत. संतोष रहेरे, मधुकर भरसट, अशोक बागुल हे अगोदरपासूनच तालुक्यात दौरे करत आहेत. अलीकडच्या काळात माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बाजू भक्कम झाली आहे. त्यांनीही तिकिटावर दावा केला आहे. संतोष रहेरे यांनी शरद पवारांची तीन ते चार वेळेस भेट घेतल्याने इच्छुकांचे कान टवकारले आहेत. हे सर्व घडत असताना नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनीही राष्ट्रबादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे.वडील जरी महायुतीत असले तरी लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे काम करून भास्कर भगरे यांच्या विजयात मोलाचा हातभार लावल्याचे पश्चिम भागातील गावोगावाच्या आकडेवारीनुसार गोकुळ झिरवाळ यांनी पक्षाला पटवून दिले आहे.

त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होते, याकडे लक्ष लागले आहे. तुतारीचा दावा दिंडोरी-पेठ मतदारसंघात असला तरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक आहेत. माजी आमदार रामदास चारोस्कर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, रामदास चारोस्कर वांनी गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. अनेक मेळावे, उ‌द्घाटने यानिमित्त ते चर्चेत राहिले आहेत. त्यांची प्रचाराची फेरी पूर्ण झाली आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती, दिंडोरी नगरपंचायतीवर आज चारोस्कर गटाचेच वर्चस्व आहे.चारोस्करांनी सुनीता चारोस्कर यांच्यामागेही ताकद उभी केली आहे. पेठचे भास्कर गावित यांनी मागील निवडणुकीत पराभव पचवला असून बंदासुद्धा ते इच्छुक आहेत. त्यांनीही जनसंपर्क ठेवला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जयंत दिंडे (Jayant Dinde) यांचा करिश्मा ग्रामीण शिवसैनिकांवर आहे. त्यामुळे शिवसेनेचे मतदानसुद्धा निर्णायक ठरणार आहे. ठाकरेंची शिवसेना ही आदेशावर चालते. मनसेनासुद्धा दिंडोरी तालुक्यात सक्रिय झाली आहे. मनसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोज ढिकले, तालुकाप्रमुख अमोल उगले आदी कामाला लागले आहेत. मनसेनेने जागा लढवल्यास सुधाकर राऊत यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. वंचित आघाडीची ताकद तालुक्यात मोठी आहे. त्यामुळे वंचित आघाडीसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. रिपाइं (आठवले गट) ची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. रिपाई तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सागर गायकवाड, रत्नाकर पगारे, रविकुमार सोनवणे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. एकंदरीत राजकीय आराखडा पाहिल्यास पक्षापेक्षा राजकीय गटातटावरच दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक दिसून येत आहे. राजकीय डावपेचात शेटे गट आणि डोखळे गट कुणाला आघाडी मिळवून देतात तसेच कोणता उमेदवार कशी गटबांधणी करतो, यावर त्याचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

सोशल मीडियावर ‘अरे-कारे’

लाडकी बहीण योजना दिंडोरी विधानसभा मतदारसंघात किती प्रभावी ठरते, हे सोशल मीडियावर जास्त झळकत आहे. लाडकी बहीण नेमकी कुणाला पावणार? आणि कुणाला पाहणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघात पेसा भरती, मराठा / ओबीसी/आदिवासी आरक्षण, रस्ताप्रश्न, माकप मतदान, मुस्लीम मतांची गोळाबेरीज, संविधान इत्यादी प्रश्नांवर प्रचार यंत्रणा राबवली जाणार असून त्यानिमित्त सर्वच राजकीय पक्षांचे सोशल मीडिया सेल जागे झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सोशल मीडियावर चांगलेच गरम होत चालले आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, राज ठाकरे यांचे व्यंगचित्र, पोस्टर्स, विविध योजनांचे पोस्टर्स राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर फिरत असून त्या पोस्टखाली आरोप- प्रत्यारोपांच्या फेन्या झडत आहेत. सोशल मीडियावरील वॉर ‘आहो काहो’वरून ‘अरे-तुरे’ वर येऊन पोहोचले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या