नाशिकरोड | दिंगबर शहाणे | Nashik Road
विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) पडघम लवकरच वाजणार असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar) वतीने या अगोदर ‘जनसन्मान यात्रा’ काढण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) वतीने ‘शिवस्वराज्य यात्रा’ (Shiv Swarajya Yatra) काढण्यात आली. ही यात्रा नाशिक शहरात आल्यानंतर दोन ठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. मात्र, आता जागावाटपानुसार शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघ व देवळाली विधानसभा मतदारसंघ या दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला ‘शिवस्वराज्य यात्रा’ पावणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द
पूर्व विधानसभा मतदारसंघातून (East Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार व कामगार नेते जगदीश गोडसे तसेच अतुल मते, गोकुळ पिंगळे त्याचप्रमाणे गणेश गीते हे इच्छुक आहे. या सर्व उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला आहे. जगदीश गोडसे यांनी तर जेलरोड येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहमेळाव्याचे आयोजन करून एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्याचप्रमाणे इतर उमेदवारांनी ही आपला प्रचार सुरू केला आहे. परिणामी या आठवड्यातच निवडणुकीचा (Election) कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर उमेदवारांची प्रत्येक राजकीय पक्षाकडून घोषणा होणार आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : ३० सप्टेंबर २०२४ – निवडणुकांसाठी एक धडा
त्यापैकीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी (Candidacy) मिळणार, याबद्दल चर्चा सुरू असून उमेदवारी मिळण्याबाबत कोण बाजी मारतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच जागा वाटपामध्ये देवळाली मतदारसंघसुद्धा महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. परिणामी देवळाली मतदारसंघातून डझन भरापेक्षा अधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक आहे. शिवस्वराज्य यात्रा जेव्हा देवळाली मतदारसंघात आली. तेव्हा सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांना घेऊन मेळाव्याला हजेरी लावली व एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : तोतया पोलीस बनून लूट करणाऱ्या बंटी-बबलीचा पर्दाफाश; बंटी ताब्यात, बबली फरार
दरम्यान, या मेळाव्यात खा. अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मार्गदर्शन केले.मात्र, ज्यांच्या भाषणाची कार्यकर्ते वाट बघत होते ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केलेच नाही. त्यामुळे उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख करून दिली. त्यानंतर काही उमेदवारांना एका खोलीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने आता उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे एक प्रकारे शिवस्वराज्य यात्रा दोन्ही मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पावणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा