नाशिक | निशिकांत पाटील | Nashik
नाशिक जिल्ह्यात तीन आमदार पाच वेळा, एक आमदार चार वेळा तर तीन आमदार तीन वेळा निवडून आल्याने मंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार, या चर्चाना आता उधाण आले आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे येवल्यातील उमेदवार छगन भुजबळ हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. मालेगाव बाह्यचे उमेदवार दादा भुसे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत सलग पाचव्यांदा विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. दिंडोरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी आदी एक वेळा व सलग तीन वेळा अशी चार वेळा निवडणूक जिंकली. तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे व चांदवडमधून डॉ. राहुल आहेर यांनी सलग तीनवेळा विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केली.
नाशिक पूर्वमधून भाजपतर्फे राहुल ढिकले, देवळालीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहेर, नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे, इगतपुरीमधून राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, कळवणमधून राष्ट्रवादीचे नितीन पवार, बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे व निफाडमधून राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी सलग दुसऱ्यादा विजय मिळवला. छगन भुजबळ यांची १९७३ मुंबई महापालिकेवर निवड झाली. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता पद मिळाले. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर पद भूषविले. १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर होण्याची संधी मिळाली. १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री, एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद भूषविले. १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री, एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद भूषविले.दि. ११ नोव्हेंबर, २०१० रोजी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली. या फेररचनेमध्ये भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाच्या मंत्री पदाचा कार्यभार कायम ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारीही सोपविण्यात आली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि. २८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भुजबळ यांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मालेगाव बाह्यचे शिवसेना उमेदवार दादा भुसे यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी पुन्हा हिरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे पवन ठाकरे यांचा ३७ हजार मतांनी पराभव करत हॅट्ट्रिक केली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचा ४७ हजार मतांनी पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. त्यानंतर युती शासनाच्या काळात त्यांनी सहकार व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद भूषविले. त्यानंतर आघाडी सरकार स्थापन होताच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली होती, माजी सैनिक कल्याण व कृषिमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी त्यानंतर सांभाळली. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यावेळी त्यांना कृषीमंत्री व नाशिकच्या पालकमंत्री पदी काम करण्याची संधी मिळाली. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांचा पराभव करून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश मिळवले.
माणिकराव कोकाटे हे १९९९ व २००४ मध्ये ते शिवसेनेकडून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व २००९ मध्ये ते काँग्रेसतर्फे विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत वाजे यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा आता म्हणजे २०२४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांचा पराभव करत पाचव्यांदा सभागृहात जाण्याचा मान मिळवला आहे. नरहरी झिरवाळ हे चार वेळा आमदार म्हणून दिंडोरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत त्यांनी विजय मिळविला. त्यानंतर २००९ मध्ये धनराज महाले यांच्या विरोधात ते निवडणूक लढले, मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१४ ते आत्तापर्यंत सलग तिसऱ्यांदा त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. २०१९ मध्ये आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळाले होते. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये देखील ते विधानसभा उपाध्यक्ष राहिले. नाशिक जिल्ह्यातील महायुतीतर्फे निवडून आलेल्या आमदारांमध्ये अनुभवी मंत्र्यांसह नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का, अशी चर्चा जिल्हाभरातून रंगताना दिसून येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा