अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या दोन ते अडीच वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पालिकांच्या निवडणूका, सहकारच्या बड्या संस्थांच्या निवडणूकामध्ये बसलेला खो यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात राजकीय बेरोजगार झालेल्या दुसर्या आणि तिसर्या फळीतील नेत्यांनी आपला मार्चा थेट विधानसभा निवडणुकीमुळे वळवल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेचे 288 मतदारसंघ असून यात नगर जिल्ह्यात 12 मतदारसंघाचा समावेश आहेत. राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसात 991 मेदवारांनी 1 हजार 292 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल होणे बाकी असून मंगळवार (दि.29) पर्यंत उमेदवारी दाखल करण्यास मुदत असल्याने दाखल होणार्या अर्जाचा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात पहिल्या चार दिवसात 1 हजार 13 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. यातील 53 जणांचे 69 दाखल झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्यापासून अखेरचे दोन दिवस असून जिल्ह्यातील अनेक मतदारसंघातील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही जागांवर अद्याप घोळ असून दिवाळीनंतर 4 तारखेला माघारीपर्यंत अनेक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत अनेक ठिकाणी नेत्यांसह प्रमुख उमेदवार गॅसवर असल्याचे दिसत आहे. यामुळे नेते आणि उमेदवार एकमेंकांचा अंदाज घेतांना दिसत आहेत. दरम्यान, दोन ते अडीच वर्षापासून ग्रामीण भागातील प्रमुख संस्थांच्या निवडणूक नसल्याने राजकीय बेरोजरांची संख्या वाढली असून या बेरोजगारांनी विधानसभा निवडणुकीतील गर्दी वाढली आहे. वाढलेल्या या गर्दीचा फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
नगर, संगमनेरसह 87 मतदारसंघ संवेदनशील
गेल्या सहा महिन्यांत, तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 87 विधानसभा मतदारसंघांमध्ये जप्त केलेल्या रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ, तसेच भेटवस्तू वाटण्याचे प्रमाण, तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार हे मतदारसंघ खर्च संवेदनशील म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले आहेत. तसेच अन्य राज्यांच्या सीमेलगत असलेले विधानसभा मतदारसंघदेखील संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. यासाठी प्राप्तिकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, राज्य राखीव पोलिस बल व राज्य पोलिस दलाचा अभिप्राय ग्राह्य धरण्यात आला आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या पथकांव्यतिरिक्त आणखी स्थिर व भरारी पथक नेमण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकार्यांना देण्यात आले आहेत. या पथकांमध्ये राज्याच्या पोलिस विभागातील अधिकारी किंवा कर्मचार्याव्यतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाचे अधिकारी किंवा कर्मचारी नेमावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यात नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नगर शहर मतदारसंघाचा समावेश आहे.