राहाता |वार्ताहर| Rahata
नगरपरिषदेच्या कातनाला पाणी साठवण तलावात मृत माशांचा मोठा खच पडला होता. कोरडा पडलेल्या तलावात नुकतेच गोदावरी कालव्यातून पिण्याचे पाणी सोडण्यात आले. यावेळी तलावात काही टन माशांचा खच होता. पाणी दूषित होऊ नये व या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये याकरिता नगरपरिषद प्रशासनाने वेळीच पावले उचलली आणि काही तासात सुमारे दोन टन मृत माशांचा खच व घाण कचरा तलावातून बाहेर काढून त्याची योग्यरितीने विल्हेवाट लावली.
ही विल्हेवाट लावली नसती तर नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याच्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली असती. मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे यांनी दोन्ही विभागातील कर्मचार्यांच्या मदतीने तलाव स्वच्छ केला. दरम्यान दोन दिवस चाललेल्या या कामांमध्ये तलावातील पालापाचोळा तसेच कालव्यातून वाहून आलेला कचरा इतर घाण यासह सुमारे दोन टन मृत माशांचा खच बाहेर काढला. हा खच ट्रॅक्टरमध्ये टाकून नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाच्या गायरानात जेसीबीच्या साह्याने खड्डा घेऊन मृत माशांची विल्हेवाट लावण्यात आली.
तलावात पाणी आटल्यानंतर मृत माशांचा सडाच या ठिकाणी अनुभवायला मिळाला. तलावाच्या परिसरात यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती. ही दुर्गंधी तसेच मृत मासे व घाणीचा कचरा यामुळे या तलावातील पाण्याच्या शुद्धतेविषयी नागरिक तसेच पाणीपुरवठा विभागाला अधिक चिंता पडली होती. पाणी सुटल्यानंतर तलाव पूर्णपणे भरून घेतला. त्यानंतर पाण्यावर तरंगणारी मृत मासे, घाण, पालापाचोळा व कचरा कर्मचार्यांच्या मदतीने साफ करून तलावाच्या बाहेर काढण्यात आला. जवळपास दोन टन मृत मासे व इतर कचरा बाहेर काढल्याने तलावातील पाण्याची दुर्गंधी कमी झाली आहे. तलावातून पाणी पालिकेच्या विहिरीत घेऊन त्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पातून हे शुद्ध झालेले पाणी प्रथमता अहमदनगर येथे रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे.
तेथील अहवाल योग्य आल्यानंतर या जलशुद्धीकरण केंद्रातून नळांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती अशोक साठे यांनी दिली. दरम्यान साठवण तलावातील कचरा हटाव व स्वच्छतेच्या मोहिमेत विठ्ठल बनकर, चंद्रकांत कुदळे, राजेंद्र गुंजाळ, गोविंद निकाळे, लखन गोयर, रघुनाथ जारे, संदीप सदाफळ, विलास साळवे, प्रकाश धावडे, ऋषिकेश सदाफळ, दिपक आरणे, अमोल बनकर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
धरणात पाणीसाठा कमी झाल्याने साठवण तलावात पुन्हा पाणी सोडण्यासाठी पुढील आवर्तन केव्हा मिळेल याची शास्वती नसल्याने तसेच सध्याचा पाणीपुरवठा फक्त नगरपालिकेच्या विहिरीवरून सुरू असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून व योग्य वापर करावा. त्याचप्रमाणे दूषित अथवा दुर्गंधीयुक्त पाणी आपल्या परिसरात नळांना आल्यास नगरपालिका प्रशासन अथवा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.