अहिल्यानगर | Ahilyanagar
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. आता वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दिलीप खेडकर यांनी यंदाची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यानंतर आता ते शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. तसेच, आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे दिलीप खेडकर यांनी म्हटले आहे.
दिलीप खेडकर यांनी सांगितले की “लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटूंबीयाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी दिली आहे. मात्र भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता दिलीप खेडकर यांना कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा