Wednesday, April 2, 2025
Homeनगर...अन्यथा समाजासमाजांत वैचारिक, भावनिक विरोधाची शक्यता

…अन्यथा समाजासमाजांत वैचारिक, भावनिक विरोधाची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष सुरू आहे. ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला, त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही, ही परिस्थिती खेदजनक आहे. आरक्षणाविषयी निर्णय घेण्यास उशीर झाल्यास विविध समाजांमध्ये वैचारिक व भावनिक विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आपण सर्व समाजातील धुरिणांना एकत्र बोलावून सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे, असे पत्र आदर्शगाव हिवरे बाजारचे प्रवर्तक, राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणावर राजकीय नेते, साहित्यिक यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले होते. त्यामध्ये उपोषणाच्या मार्गाने अनेक कायदे मंजूर करून घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदर्श गाव समितीचे पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. हजारे यांनी अद्याप यावर काहाही भाष्य केले नाही. पवार यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. या पत्रात पवार यांनी म्हटले आहे, 5 वर्षे महाराष्ट्रात विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष सुरू आहे. समाजात निर्माण झालेला असमतोलपणा हाच या गोष्टीला कारणीभूत आहे. सध्या मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

ही एक समाजात असमतोलपणाचीच बाजू असून त्यातून समाजात मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झालेली आहे. ज्यांना पूर्वीचे आरक्षण आहे, त्यांना आपले आरक्षण कमी होईल की काय याची भीती निर्माण होत आहे. ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मिळण्याची वाट पाहत आहेत, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. ज्या राष्ट्रपुरुषांनी समाज संघटीत ठेवून परकीयांची आक्रमणे थोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना एकत्र घेऊन केलेला संघर्ष, तर जातीभेद विसरून इंग्रजांविरुद्ध लढलेली स्वातंत्र्याची लढाई, तर पेशव्यांनी रोवलेले अटकेपार झेंडे अशा परिस्थितीत एकीकडे शेतकरी दुष्काळाशी लढतो तर दुसरीकडे शेतमालाला बाजारभाव नाही म्हणून आत्महत्या करतो.

सध्या शेती मालाला योग्य दर मिळत नाही म्हणून शेतकरी हतबल आहे. नव्याने नोकरभरती होत नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. तर मुलांच्या शिक्षणासाठी शेतजमिनी विकाव्या लागत आहे. शेतकरी व शेतमजूर आर्थिकदृष्ट्या संकटात असून त्यातून ही परिस्थिती उद्भवली आहे असे मला वाटते, असे विश्लेषण पवार यांनी केले आहे. पवार यांनी पुढे म्हटले आहे, कुठेतरी समाज आणि राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कोणाला तरी याची किंमत मोजावी लागणार आहे, हे निश्चित आहे.

तरी आपण सर्व समाजातील धुरिणांना एकत्र बोलावून सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. फारकाळ हे प्रश्न भिजवत ठेवून चालणार नाही. कारण सध्याची विविध समाजामधील तणावाची परिस्थिती आर्थिक गरजेपोटी उद्भवली आहे. परंतु उशीर झाल्यास विविध समाजांमध्ये वैचारिक व भावनिक विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकीकडे ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे, असे मला वाटते. या राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून त्यांनी समाज संघटित ठेवला आहे. तो असाच संघटित राहावा. या अपेक्षेसह वरील सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपुर्वक तातडीने विचार करावा असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते, असेही पवार यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....