
पुणे |प्रतिनिधी| Pune
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, बुधवारी (24 जून) मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची अधिकृत घोषणा हवामान शास्त्र विभागाने केली आहे. मंगळवारपर्यंत मान्सूनने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मजल मारली होती; मात्र बुधवारी उर्वरित भागही व्यापल्याने आता संपूर्ण राज्य मान्सूनच्या छत्राखाली आले आहे. या सक्रियतेमुळे हवामान विभागाने राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळल्यास दारणा,गंगापूर, भावली, मुकणे व अन्य धरणांत पाण्याची आवक वाढणार आहे. त्याचा फायदा उत्तर नगर जिल्ह्याला होणार आहे. तसेच पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाल्यास कुकडी समूह धरणांत पाण्याची आवक होईल. त्याचा लाभ दक्षिण नगर जिल्ह्याला होणार आहे.
कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, नाशिक व पुणे घाटमाथ्यावर जोरदार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज असून सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील.
मराठवाड्यातही मान्सूनने दमदार हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसासह मेघगर्जनेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या इतर भागांतही मान्सूनची प्रगती समाधानकारक असून सध्या मान्सूनची सीमा सुरत, इंदूर, मांडला, दाल्तनगंज आणि मोतीहारी या भागांतून जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती करण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
घारघरमध्ये 44 मिमी पाऊस
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात आणि पाणलोटात सलग गत चार दिवसांपासून मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले. पाऊस पडता झाल्याने या भागातील शेतकरी सुखावला आहे. काल सकाळी नोंदविल्या गेल्यानुसार भंडारदरात 16, घाटघर 44, पांजरे 22, रतनवाडीत 26 आणि वाकीत 13,निळवंडे 31, आढळा 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धणात काल सायंकाळी 2385 दलघफू (21.60टक्के) पाणीसाठा होता. तर निळवंडेत 1562 (18.74टक्के) पाणीसाठा होता. भंडारदरात गत 24 तासांत 17 आणि निळवंडेत 3 दलघफू पाण्याची आवक झाली.
काल पावसाचा वेग मंदावला होता
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरणाच्या पाणलोटातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड, पाचनई, कोतूळ भागात काल जोर कमी झाला होता.




