Saturday, July 27, 2024
Homeनगरपोल्ट्री व्यावसायिकांना सौरऊर्जा प्रकल्प फायदेशीर ठरेल- आहेर

पोल्ट्री व्यावसायिकांना सौरऊर्जा प्रकल्प फायदेशीर ठरेल- आहेर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पोल्ट्री व्यवसायीकांसाठी राज्य सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला असून, पोल्ट्री व्यवसायीकांना दिलासा देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध योजनांचे निर्णय करून, अंमलबजावणी सुरू केली आहे. पोल्ट्री व्यवसायीकांसाठी राबविण्यात येणार्‍या सौर उर्जा प्रकल्प हा व्यावसायीकांच्यादृष्टीने मोठा दिलासा ठरेल, असा विश्वास राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य धनंजय आहेर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायीकांसाठी संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य धनंजय आहेर, एकनाथ मुंगसे, सुदर्शन पोकळे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. दशरथ दिघे, डॉ. येवले,डॉ.जोंधळे यांच्यासह पोल्ट्रीचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोल्ट्री व्यवसायीकांच्या समस्यांसाठी राज्यस्तरावर प्रथमच समिती स्थापन करून, महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास प्रारंभ केल्याबद्दल व्यावसायीकांनी समाधान व्यक्त केले. विभागाच्या माध्यमातून विविध योजनाही आता कार्यान्वित होत असल्याचे राज्य समितीचे सदस्य धनंजय आहेर यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्यावतीने पोल्ट्री व्यावसायीकांना करपट्टी आकारली जाते. याबाबतही लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या आदेशानुसार पोल्ट्रीसाठी वापरण्यात येणारे वजनकाटे प्रमाणीत करून घेण्याची मोहीम राबविण्यात येणार असून, विशेष म्हणजे पोल्ट्री चालकांसाठी शासनामार्फत सौर उर्जा प्रकल्पाची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी पोल्ट्री व्यावसायीकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले असल्याचेही आहेर म्हणाले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील तुंबारे यांनीही शासनाच्या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यशाळेस पोल्ट्री व्यावसायीक तसेच कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या