Monday, November 25, 2024
Homeब्लॉगपोवाडा

पोवाडा

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

जत्रेत संजय मुलांना सांगत होता , डफावर थाप मारणारा आणखीन एक कलाकार तो म्हणजे शाहीर. याच्याकडे खंजेरी असू शकते, ढोलकी, कडी तुणतुण अशा पद्धतीच्या वाद्यांचाही ते उपयोग करतात. पटका, चुस्त पायजमा, सदरा किंवा बाराबंदी, कंबरेला झोला. शाहीर पोवाडा गाणार आहे. पोवाडा वीर रसातील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे पोवाडा (संस्कृत प्र + वद-पवद-पवड-पवाडा-पोवाडा) असा होतो. वीरांचा पराक्रम विद्वानांची बुद्धिमत्ता, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन किंवा स्तुति स्तोत्र म्हणजे पोवाडा. असा पोवाडा शब्दाचा साधारण अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात आढळून येतो. चला आता आलो आहोत आपण पोवाडा ऐकू. शाहीर काय म्हणतो आहे.

‘प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाणं

- Advertisement -

शिवाजी राजाच्या करामतीची करील काय कल्पना युक्तीची’

हा जी जी जी

हा पोवाडा अद्न्यातदास यांचा अफजलखानाचा वध यातील आहे.

पोवाडा मुख्यत्वे वीररसाचा आविष्कार असतो. वीर आणि मुत्सदी पुरुषांच्या लढाया त्यांचे पराक्रम इत्यादींचे जोरकस शब्दचित्र पोवाड्यात असते. हा एक मराठी काव्यप्रकार. प्राचीन उपलब्ध पोवाड्यात पुढील तीन प्रकारची कवने आढळतात.

1) देवतांच्या अद्भूत लीला आणि तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य

2) राजे, सरदार व धनिक यांचे पराक्रम, वैभव, कर्तुत्व इत्यादींचा गौरव.

3) लढाई, दंगा, दरोडा, दुष्काळ, पूर इत्यादी उग्र वा कुतुहलजनक घटनांचे निवेदन.

या तीन प्रकाराच्या कवनांचे गायक व श्रोते हे देखील मुळात वेगवेगळे होते. पहिल्याचे गायक गोंधळी आणि श्रोते भाविक. दुसर्‍याचे गायक भाट आणि श्रोते संबंधित व्यक्ती व त्यांचे अश्रित.

तिसर्‍याचे गायक शाहीर व श्रोते सर्वसामान्य जनता.

विस्तार, सामर्थ्य, पराक्रम, स्तुती या अर्थी पवाड हा शब्द प्राचीन वागडमयात योजलेला आढळतो.पोवाडे जाणार्‍या कलाकारास ‘शाहीर’ म्हटले जाते पोवाडयाचा उल्लेख ज्ञानेश्वरीमधे ‘पवद’ असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.

मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ती देणारा गीत प्रकार. भारतात याचा उदय साधारण 17 व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते.

1659 मध्ये ‘छत्रपती शिवाजी राजे’ यांनी ‘अफजलखानाच्या वध’ केला त्याच प्रसंगावर शाहीर अद्न्यातदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणार्‍या तानाजी वर पोवाडा केला होता. तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरावर पोवाडा होता.

दुसरा कालखंड पेशवाईतील पोवाड्यांचा. त्याची सुरुवात पानिपतच्या पोवाड्यांनी व शेवट खडकी अष्टी येथील लढवयांच्या पोवाड्यांनी होती. पानिपतच्या लढाईवर अनेकांनी पोवाडे रचले आहेत. महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, प्रभाकर अशा अनेकांनी अनेक पोवाड्यांची रचना केली. इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे हे पुस्तक लिहून 1891 मध्ये प्रसिद्ध केले महानुभाव संप्रदायातील भानुकवी जामोदेकर यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा वगैरे पोवाडा लिहिले होते.

एकूण पोवाड्यांपैकी काही पोवाडे तानाजी मालुसरे आणि सिंहगड, बाजी पासलकर, पानिपतवरची लढाई, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू, थोरल्या माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई सती गेल्या तो वृत्तांत. खडकीची लढाई, शेवटले बाजीराव पेशवे, गायकवाड नागपूरकर, आप्पासाहेब भोसले असे सुमारे 44 पोवाडे अनेक शाहिरांनी रचलेले आहेत.

1803 व 1804 या सालात पुणे शहरात व आसपासच्या प्रदेशात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे अन्नधान्याची महागाई झाली होती. त्यावेळचे वर्णन राम जोशी यांनी त्यांच्या पोवाड्यात केले आहे त्यातील काही भाग

हे राहो भाजीत बागवान जोडका।

पैशाचा एक चिमुडा एक दोडका।

पैशाचं मक्याचा कंद एक मोडका।

हा कांदा दो पैशास एक बोडका।

जळणास रुपयाला एक लहान खोडका ।

काळाने देश या परी केला रोडका ॥

अशा पद्धतीने हा पोवाडा असतो. पोवाडा हा गद्यपद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. तो पूर्वी राजदरबारात व लोकसमूहासमोर आवेश पूर्णरित्या डफाच्या तालावर सादर केला जात होता.

पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रीतीरिवाजांचे वर्णन केलेले असते. लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाडयाचा मुख्य हेतू असतो.

दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात म्हणजे पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

पोवाडयातील चरण हे आठ आठ मात्रांचे क्वचित चार मात्रांच्या आवर्तनात गायले जातात. मात्र लघुची एक व गुरुच्या दोन या हिशोबाने मात्रा मोजत नाहीत पोवाडा गातांना चरण त्या मात्रात बसविले जातात. ही आवर्तने व अंत) यमक यांनी पोवाड्याला पद्याचे रूप येते. पोवाड्यातील परिच्छेदाला ‘चौक’ ही संज्ञा असून एकेका चौकात कितीही चरण येऊ शकतात. चौकात कित्येक वेळा छोट्या चरणांचे अंतरे असतात. चौकाच्या शेवटी पालुपद घोळले जाते. चरणांच्या अंती अधून मधून जी जी जी ची जोड साथीदार देत असतो. पोवाड्यात कथेचे व घटनेचे नुसते निवेदन नसते तर दर्शन असते. काही पोवाड्यात पद्य भागाला जोडून मध्ये मध्ये गद्यकथनही येते. शिवकालीन सिंहगडाच्या पोवाडयात 55 चौक आहेत यावरून पोवाडा च्या लांबीची कल्पना यावी. संगीताच्या दृष्टीने पोवाडा हा प्रांगणीय कंठसंगीताचा एक प्रकार. कारण तो चौका चौकातून, बाजारपेठातून व प्रशस्त मोकळ्या जागी मोठ्या जनसमूहासमोर गायिला जातो.

मालोजी राजा । तुझा बा आजा ।

यवनी काजा । पाळील्या फौजा ।

लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ।

भूषण पवाड गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥1॥

अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला.

अलीकडे महिलांनी केलेल्या कामगिरीवरही पोवाडा लिहिला जात आहे

आशिया खंडात । भारत देशात ।

झाल्या अनेक । महिला थोर ।

अनेक क्षेत्रात। त्या कार्यरत ।

गाऊ त्यांचे, आपण गीत ॥ धृ ॥

जी जी जी

अशा पद्धतीने मुलांनो शब्दातून, सुरातून, तालातून पोवाडा सजवला जातो.

तोच आता तुम्हाला जपून ठेवायचा आहे मनामनातून.

मनात पोवाड्याचे गीत गुणगुणत मुले पुढच्या कलाकाराकडे निघाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या