Friday, May 31, 2024
Homeनगरवीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण

वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

वीज बिल जास्त का आले ? असे म्हणत वीज महामंडळाच्या कार्यालयात जाऊन महावितरणचे सहाय्यक अभियंता मयुर रमेश जाधव यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मयुर जाधव यांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच अनिल जगन्नाथ ढाकणे (रा. वामनभाऊनगर) पाथर्डी याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महावितरणचे सहाय्यक अभियंत जाधव हे पाथर्डी शहर कार्यालयात सुमारे तीन वर्षापासून कार्यरत आहेत. जाधव गुरुवारी सकाळी कार्यालयात आल्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ढाकणे हा वीज महामंडळाच्या कार्यालयात आला. माझ्या घराचे वीज बिल जास्त कसे आले असे जाधव यांना म्हणाला. तुमच्या मीटरचा घोटाळा असेल तर कामगार पाठवून पाहतो, असे मात्र मीटरचा दोष नसेल तर तुम्हाला वीज बिल भरावे लागेल असे जाधव यांनी ढाकणे यांना सांगितले.

यावर ढाकणे यांनी जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गचांडी धरून खुर्चीला लाथ मारली व जाधव खाली पडले त्यानंतर ढाकणे याने जाधव यांच्या तीन-चार कानशिलात लावत मारहाण केली व तू कार्यालयाबाहेर ये मग बघतो तसेच तु संध्याकाळपर्यंत पाथर्डी सोड नाही तर तुला जीवे मारतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. उपस्थित कर्मचार्‍यांनी जाधव यांना ढाकणे यांच्या तावडीतून सोडविले.

याबाबत जाधव यांनी वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर जाधव यांच्या यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे मारहाण करणे, धमकावणे आदी कलमान्वये ढाकणे याच्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सहाय्यक अभियंता मयुर जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कामबंद ठेवून पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या