संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
अनधिकृतपणे तात्पुरती मीटर जोडणी करून देण्याच्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेताना तालुक्यातील चंदनापुरी येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यास हिवरगाव पावसा येथे काल लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
वीज वितरण कंपनीच्या चंदनापुरी कक्ष 1 मध्ये कार्यरत असलेला श्रीधर परसराम गडाख (वय 40) हा बाह्य स्त्रोत कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकला आहे. हिवरगाव पावसा येथील एका शेतकर्याने या कर्मचार्या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या शेतकर्याने त्याच्या घरात विद्युत जोडणी घेण्यासाठी आईच्या नावावर कोटेशन भरले होते. वीज वितरण कंपनीचा कर्मचारी गडाख याने नवीन मीटर जोडणी मिळेपर्यंत अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन दिले व त्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची मागणी केली. यामुळे संतापलेल्या या शेतकर्याने गडाख याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने काल हिवरगाव पावसा येथे येऊन सापळा लावला.
पथकाच्या सापळ्यात गडाख हा पैसे घेताना रंगेहात अडकला. हिवरगाव पावसा गावातील दर्शन किराणा अॅण्ड जनरल स्टोअर येथे लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे व रमेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख, राहुल डोळसे यांचा समावेश होता.