Monday, July 22, 2024
Homeनाशिकभूमी अभिलेखाचा कारभार अंधारात

भूमी अभिलेखाचा कारभार अंधारात

निफाड | प्रतिनिधी | Niphad

- Advertisement -

येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे (Land Records Office) अंदाजे 22 हजार रु. वीजबिल थकित झाल्याने वीजवितरण कंपनीने या कार्यालयाचा वीजपुरवठा (Power supply) खंडित केला. गेल्या आठ दिवसांपासून या कार्यालयातील कामकाज अंधारातच सुरू आहे…

याशिवाय वर्षभरापासून अधीक्षकपद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबू लागली आहेत. अपुर्‍या सेवकांमुळे शेतकर्‍यांना या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांचेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्याचा कॅलिफोर्निया (california) म्हणून निफाड तालुक्याची (Niphad taluka) ओळख सर्वदूर आहे. शासनाला सर्वाधिक महसूल याच तालुक्यातून मिळतो. मात्र ‘नाव मोठं अन् लक्षण खोटं’ अशी सध्या परिस्थिती तालुक्याची झाली आहे.

जमिनीचे सातबारा उतारे, चतुर्सिमा, गाव नकाशे, घर, वाडा, रस्ते आदींचे दस्तवेज सुरक्षित ठेवणार्‍या येथील भूमी अभिलेख कार्यालयाबाबत शासनाची असलेली उदासीनता आता चव्हाट्यावर आली आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षकपद हे गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे.

परिणामी येवला तालुका (Yeola Taluka) भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक राजपूत यांच्याकडे निफाड भूमी अभिलेख कार्यालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यातही राजपूत हे आठवड्यातील एक दिवस म्हणजे मंगळवारीच निफाडच्या कार्यालयात येतात.

साहजिकच एका दिवसात किती नागरिकांची कामे होतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे. येथे पूर्ण वेळ अधीक्षक द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हा अधीक्षक महेंद्र शिंदे (Mahendra Shinde) यांच्याकडे केली असून अद्यापपर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही.

कार्यालयाचे कप्तान पदच रिक्त असताना आता या कार्यालयाचे वीजबिल (Electricity bill) अंदाजे 22 हजार रुपये थकित झाले असल्याने वीजवितरण कंपनीने भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा आठ दिवसांपूर्वीच खंडित केल्याने येथील सेवकांवर अंधार्‍या खोलीतच काम करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा वाढता विस्तार विचारात घेता येथे 25 सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र असे असतानाही या कार्यालयातील एक जागा रिक्त आहे तर एक सेवक अनधिकृतपणे गैरहजर आहे. कार्यालयाचे अधीक्षक पद रिक्त असल्याने जनतेची कामे खोळंबू लागली असून नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार या कार्यालयाकडे चकरा माराव्या लागत आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे दस्तऐवजाच्या नकला काढणे, उतारे देणे आदी कामे खोळंबली आहे. तसेच या कार्यालयाचे एक वर्षापासून रिक्त असलेल्या तालुका भूमी अभिलेख अधीक्षकाची कायमस्वरुपी नियुक्ती करण्याबरोबरच थकीत वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून देवून कामेनागरिकांची खोळंबलेली ससुरळीत करण्यासाठी हकार्य करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करू लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या