लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोमणा मारला.
संजय राऊतांनी रंग बदलू नये असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे अशी टीका राऊतांनी केली. इतिहास काढला तर प्रफुल्ल पटेलांना महाराष्ट्र सोडून जायला लागेल असंही संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रफुल पटेलांनी सोशल मीडियात पोस्ट करून राऊत यांना पुन्हा डिवचले आहे. मात्र, यावेळी पटेलांनी शरद पवारांकडे बोट दाखवले आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर पटेलांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, अंगूर खट्टे हैं. माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.
वक्फ सुधारित विधेयकावर बोलताना पटेलांनी बाबरी मशीद आणि मुंबईतील दंगलीचा मुद्दा काढत संजय राऊतांना डिवचले होते. राऊतांना संजयभैया असे म्हणून रंग बदलू नका, असा टोला लगावला होता. त्यावेळी राऊतांनीही सभागृहातच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.
पटेलांच्या या भाषणानंतर संजय राऊतांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत त्याचा समाचार घेतला. प्रफुल पटेल संसदेत आहेत त्याची लाज वाटते. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षात घेतले. प्रफुल पटेल सारख्या माणसाला घेऊन अजित पवारांनी स्वतः अवमुल्यन करून घेतलंय. प्रफुल पटेल सारखे लोक कोणाचे नाहीत ते दलाल आहेत, असी जहरी टीका राऊतांनी केली.