राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
केंद्रात व राज्यात सत्ता असूनही 10 ते 12 दिवस सत्ता नाट्यावरून वाया घालण्यापेक्षा पटकन निर्णय घेऊन हे सरकार कामाला लागेल, अशी अपेक्षा होती. राज्यातील जनतेने तुम्हाला ही सत्ता नाट्ये करण्यासाठी बहुमत दिले नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. गेल्या अडीच वर्षापूर्वी ज्याप्रमाणे हे महायुतीचे सरकार सत्तेत होते. 50 खोक्यांचा आरोप राज्यातील जनतेने त्यांच्यावर केला होता. ज्या पध्दतीने कांद्याची निर्यातबंदी लादली गेली आणि सर्व शेतमालाचे भाव त्याठिकाणी पाडले गेले. दुधाचे दर देखील पाडून अनुदानाचे पैसे दिले नाही. यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग महायुतीच्या सरकारवर नाराज होता.
त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी खात्री होती. मात्र, हा विधानसभेचा निकाल राज्यातील जनतेच्या अनाकलनिय आहे. जनतेच्या मनात इव्हिएमच्या बाबतीत संभ्रम आहे. यासाठी सोलापूर जिल्हातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी चिठ्ठ्यावर प्रतिकात्मक मतदान घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रशासनाने हाणून पाडला. यामुळे संशयाला जागा वाढली आहे. तसेच यापूर्वी इतिहासात मतदाना एवढा टक्का वाढला नसल्याने संशय येणे साहजिक आहे. यासाठी राज्यातील जनतेच्या मनातील शंका निवडणूक आयोगाने दूर करण्यासाठी कागदावर मतदान होणे गैर नसल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे.
विधानसभेचा निकाल लागून 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटला आहे. आमच्या लाडक्या बहिणी 2100 रुपयांच्या प्रतिक्षेत आहेत. आमचा शेतकरी कर्जमाफी व वीजबिल माफीच्या प्रतिक्षेत आहे. जी आश्वासने यांनी निवडणुकीच्या काळात दिली होती ती या सरकारने लवकर पूर्ण केली पाहिजे. आमच्या लाडक्या भावांचे अजून पगार झाले नाहीत. इतके दिवस सत्ता नाट्यावरून वाया घालवण्यापेक्षा हे कामाला लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, रुसवा-फुगवीत व दिल्लीच्या वार्यांची नाटके सुरू आहे. राज्यातील जनतेने तुम्हालाही नाटक करण्यासाठी बहुमत दिले नाही. जी आश्वासने तुम्ही लाडक्या बहिणी व शेतकर्यांना दिली होती, ती तात्काळ पूर्ण होतील, असा आशावाद तनपुरे यांनी व्यक्त केला.