Friday, October 18, 2024
HomeराजकीयPrakash Ambedkar On Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईत दाऊदला...

Prakash Ambedkar On Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईत दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुंबई | प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबईत विमानतळावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली. तेथे त्यांना सोन्याची माळ घालण्यात आली, असा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला. याबात केंद्र सरकार आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, १९८८-९१ मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी लंडनचा दौरा केला होता. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले होते. तिथे ते दोन दिवस राहिले. तेथे त्यांची कोणासोबत बैठक झाली याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे, अशी मागणी करतानाच कॅलिफोर्नियामधून पवार लंडनला पुन्हा आले.

दोन दिवस ते लंडनमध्ये थांबले. तेथून ते दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. तिथे त्यांना सोन्याची माळ घालण्यात आली, त्यानंतर पवार हे पुन्हा संध्याकाळच्या विमानाने लंडनला गेले आणि तेथून दोन दिवसांनी ते भारतात परतले, असा दावा आंबेडकर यांनी केला.

कोणत्याही मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय परदेश दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्या वेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि मुख्यमंत्री म्हणून पवार यांनी त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केले.

शरद पवार हे दुबईला गेल्याचे प्रकरण त्यावेळी दाबले गेले, असा आरोप आंबेडकर यांनी केला. यासंदर्भात केंद्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही खुलासा करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. दाऊदला भेटायची परवानगी नसेल तर ते भेटले कसे, असा सवाल करत या भेटीची विस्तृत माहिती जनतेसमोर यायला हवी, असेही आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात जर शांतता ठेवायची असेल तर हा खुलासा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा पक्षाला मतदान करायचे की नाही याचा विचार करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी मतदारांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या