मुंबई | Mumbai
कुरापतखोर चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) अक्साई चीनचाच (Aksai Chin) भाग असल्याचा दावा केला आहे. यावरुन सध्या देशासह जगभरात खळबळ माजली आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. त्यांना हा भ्रम असण्यात काहीच अडचण नाही. पण त्यांनी चीनच्या मुद्यावर आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे ते म्हणालेत.
प्रकाश आंबेडकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणतात. त्यांना हा भ्रम असण्यात मला काहीच अडचण नाही पण, ते खरंच विश्वगुरू असतील तर त्यांनी आणि भाजप-आरएसएसच्या त्यांच्या गुंडांनी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.
-
चीनने नकाशा प्रकाशित करून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वतःचा भाग दाखवले आहे. विश्वगुरूच्या राज्यात भारताची भूमी चीनमध्ये का दाखवली जातेय?
-
अरुणाचल प्रदेशातील जागांचे नाव चीन का बदलतेय?
-
भारताने विरोध करूनही BRICS चा विस्तार करण्यात आला हे खरे आहे की नाही? तुमचा विश्वगुरूचा शिक्का बिनकामाचा आणि नावापुरताच आहे का? या विस्तारामुळे भारतापेक्षा चीनची ताकद वाढली नाही का?
-
प्रत्येक घुसखोरीत चीन आपली जमीन बळकावते. BRICS च्या भेटीमध्ये चीनच्या वाढत्या घुसखोरीबद्दल चर्चा केली का?
-
तिबेटला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता का देत नाही?
-
चीनवर तुमची भूमिका इतकी नरम का? त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही?
-
तुमचा जोश आता हाय नाही का? की २०१४ च्या निवडणुकीत भाजप-आरएसएसने चिनी कंपन्यांकडून घेतलेला राजकीय निधी वापरल्या म्हणून?
कृपया उत्तर द्या.
“मोदी खोटं बोलत होते, संपूर्ण लडाखला माहितीये की…”, चीनचा उल्लेख करत राहुल गांधींचं टीकास्र
काय आहे नेमक प्रकरण?
चीनने अलीकडेच त्याच्या मानक नकाशाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. चीनने नकाशा जाहीर करताच वाद निर्माण झाला. वास्तविक, चीनने भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला. यानंतर भारताने सांगितले की, अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.
चीनने सोमवारी २०२३ चा नवा नकाशा जारी केल्याचे वृत्त चिनी वृत्तपत्राने दिले होते. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा प्रदेश देखील दाखवला आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. मात्र, भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारताने चीनचा हा नकाशा नाकारला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तो भारताचा अविभाज्य भाग राहील. त्याचबरोबर चीन तैवानलाही आपल्या भूभागाचा भाग मानतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी चीन व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि दक्षिण चीन समुद्रावरही दावा करतो.