Saturday, May 18, 2024
Homeनगरराजकारणातील घराणेशाही संपवा; मोदींनी देशाला…!

राजकारणातील घराणेशाही संपवा; मोदींनी देशाला…!

श्रीरामपूर/अहमदनगर |प्रतिनिधी| Shrirampur | Ahmednagar

भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी असून, या धोरणामुळे देश कणाहीन होत चालला आहे. त्यांनी देशाला ‘बनाना रिपब्लिक’ करून ठेवला आहे. म्हणजेच कोणीही यावे आणि टिपली मारून जावे, अशी परिस्थिती आहे. यामुळे आता मतदारांनी देशातील आणि जिल्ह्यातील राजकीय घराणेशाही आधी संपवण्याची गरज असल्याचे मत वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, नगर जिल्ह्याच्या विकासात साखर कारखानदारी हीच मोठी अडचण असल्याचा दावा करत त्यांनी नगर जिल्ह्यातील घराणेशाहीवर सडकून टीका केली.

- Advertisement -

अ‍ॅड.आंबेडकर यांनी शनिवारी श्रीरामपूर आणि अहमदनगर येथील सभांमधून सत्ताधार्‍यांवर टीका केली. शिर्डीतून वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. ते म्हणाले, करोना काळामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या मोदी यांना काँग्रेसने मौत का सौदागर म्हटले होते. काँग्रेसचे ते म्हणणे योग्यच होते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने करोना काळामध्ये रेमडीसीवर हे देऊ नये, हे स्पष्ट केले होते. अन्य देशांनी त्यावर बंदी घातली असतांना आपल्या देशात मोदी यांनी संबंधीत कंपनीला मुभा दिली. कारण त्यांचा मालक गुजराती होता. तसेच त्यांनी भाजपसाठी इलेक्टोरल बॉण्ड खरेदी केले आणि त्यानंतर त्यांना रेमडीसीवर विकायची परवानगी दिली गेली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. जो माणूस पक्षाची तिजोरी भरतो व लोकांच्या जीवनाशी खेळतो त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का, असा सवाल आंबेडकर यांनी यावेळी केला. मोदी यांनी देशाला बनाना रिपब्लिक करून ठेवला आहे. त्यामुळे आपला देश आता कोणत्या उंबरठ्यावर आहे हे सांगण्याची गरज राहिली नाही. म्हणून आगामी काळामध्ये आता ओबीसी समुदायाचे राजकारण पुढे आणायचे आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे. पाणी कालांतराने गढूळ होते व त्यानंतर आपण ते पाणी फेकून देतो तशाच पद्धतीने आता हे राजकीय पाणी गढून झाले आहे, आता ते फेकून द्या, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

काँग्रेसने मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत वा अन्य कितीजणांना उमेदवारी दिली, असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, त्यांनी सर्व घराणेशाही व श्रीमंत मराठ्यांना उमेदवारी दिली आहे. हाच खेळ त्यांचा वर्षानुवर्षे चालू आहे व त्यामुळे देशाचा विकास होत नाही. भाजप, काँग्रेस, शिंदे सेना, ठाकरे सेना, दोन्ही राष्ट्रवादी या सर्वांचे उमेदवार घराणेशाहीचे असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. गेली अनेक वर्षे नगर जिल्ह्याची सत्ता ही सोयर्‍याधायर्‍यातच फिरत आहे. त्यामुळे खर्‍या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. यशवंतराव चव्हाणांनी या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यांमध्ये बंद केली आहे. याच साखर कारखान्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. साखर कारखाने शेतकर्‍यांना मदत करतात यात दुमत नाही. पण या जिल्ह्याच्या विकासात ते अडचण निर्माण करतात, हे लक्षात ठेवा. कारखान्यांची सत्ता व पदे नात्यागोत्यांमध्येच फिरती आहे. बाहेरच्याला संधीच नाही, अशी टीका त्यांनी केली.

श्रीमंत मराठ्यांना उमेदवारी
सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठ्यांना उमेदवारी दिली. मात्र, हे मराठा हे श्रीमंत आणि घराणेशाहीतील आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे यांच्या सोबत असणार्‍या मराठ्यांना त्यांनी का उमेदवारी दिली नाही. आताचे त्यांचे उमेदवार हे नात्यागोत्यातील आहे. एकाच शरिरातील उजवा सत्ताधार्‍यांकडून तर डाव्याला विरोधकांनी उमेदवारी दिलेली आहे. यामुळे कोणीही निवडून आले तरी शरिराचे नुकसान होणार नाही. आतापर्यंत हाच खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

थोरातांसाठी धोक्याची घंटा
भारतीय जनता पक्षाची माणसे ही काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना भेटत आहेत ही काँग्रेससाठी चांगली परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस बाळासाहेब थोरात यांच्या हातात दिसते. परंतु मंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, असा चिमटाही आंबेडकर यांनी काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या