मुंबई | Mumbai
जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी नाव विचारून गोळीबार (Firing) करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर भारताने पाकिस्तानबाबत पाच मोठे निर्णय घेत कोंडी केली. त्यामध्ये, पाकिस्तानची सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली, याशिवाय पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताने (India) सिंधू पाणी वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दि. २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “केंद्र सरकारने (Central Government) पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी बंद करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. मात्र, त्या पत्रात कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही.धरणातील पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करते हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून सरकारने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानी (Pakistani) नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही.कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर सातत्याने पोकळ धमक्या देत आहेत. कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. आता सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला असेल तर सरकारने त्याची फॉलोअप ऍक्शन घ्यायला हवी”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.